विद्यार्थ्यांना दिलासा, दहावीच्या ३ विषयात नववीचे प्रश्न नाही

फक्त दोनच विषयात नववीचे २० टक्के प्रश्न

Updated: Jan 25, 2019, 02:29 PM IST
विद्यार्थ्यांना दिलासा, दहावीच्या ३ विषयात नववीचे प्रश्न नाही title=

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इतिहास, राज्यशास्त्र, भुगोल विषयाच्या परीक्षेत नववीचे प्रश्न नाही विचारण्यात येणार आहे. विज्ञान, गणितासाठी मात्र नववीच्या अभ्यासक्रमावर २० टक्के प्रश्न विचारण्यात येणार आहे. दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळपत्रक याआधीच जाहीर झालं आहे. दहावीचा परीक्षेचा पहिला पेपर १ मार्च रोजी होणार असून २२ मार्चपर्यंत परीक्षा होणार आहे. 

दहावीच्या विज्ञान आणि गणिताचा १०० टक्के अभ्यासक्रम पूर्ण शिकवला जाणार असला तरी प्रत्यक्षात परीक्षेत त्यापैकी केवळ ८० टक्के प्रश्न विचारले जाणार आहेत. उरलेले २० टक्के प्रश्न नववीतील अभ्यासक्रमाचे असणार आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा अजब फंडा असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात होती. दहावीच्या विज्ञान व गणिताच्या अभ्यासाबरोबर नववीच्या विषयाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. यामुळे यंदाच्या वर्षीपासून विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येणार आहे.

गुणांची विभागणी

गणित भाग एक आणि दोन यामध्ये एकूण ८० गुणांचे प्रश्न असतील. तर विज्ञान विषयामध्येही भाग एक आणि दोनचे प्रत्येकी ४० असे एकूण ८० गुणांचे प्रश्न असतील. दोन्ही विषयामध्ये ८० पैकी १६ गुणांचे प्रश्न नववीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. त्यामुळे गणित आणि विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना १६ गुण मिळविण्यासाठी नववीच्या पाठ्यपुस्तकांची उजळणी करावीच लागणार आहे.

गणितातील जवळपास २०० ते २२५ उदाहरणे कमी झाली आहेत. विद्यार्थ्यांना दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ६४ गुणांची प्रश्नपत्रिका असेल. मात्र, नववीतील प्रश्न विचारले जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी निष्काळजी राहू नये. गणिताचा अभ्यास काळजीपूर्वकच करावा लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नववीच्या प्रश्नांमुळे यंदा दहावीचा निकाल कमी लागण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पण अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रश्न नसतील असं याआधी शिक्षण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं.