Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 227 जागा महायुतीनं जिंकल्या आहेत. भाजपनं सर्वात जास्त 131 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेनं 55 जागांवर विजय मिळवला आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 41 जागा जिंकल्या आहेत. महायुतीच्या यशासह राज्यभरात चर्चा आहे ती लाडकी बहिण योजनेची. नविन सरकार सत्तेत आल्यावर लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळणार का? यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
सत्तास्थापनेनंतर महायुती लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढवण्याबाबत पहिला निर्णय घेणार अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनात योजनेची रक्कम वाढवण्याची तरतुद केली जाईल असही त्यांनी सांगितलं. लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये मानधन मिळते. या मानधनात वाढ होऊन आता 1500 नाही 2100 रुपये मिळणार असल्याचे देखील समजते. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ला बहिण योजना बंद होणार नाही असे आश्वासन दिले आहे. यामुळे येत्या काळात ही महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे.
महायुती सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली. दर महिना 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केले. लाडकी बहीण योजनेवरून प्रचंड चर्चा झाली. निवडणुकीत महायुती सरकारनं या योजनेवरून जोरदार प्रचार केला. यामुळेच या निवडणुकीत महिलांच्या मतदानाचा टक्का वाढलाय. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचा दावा महायुतीचे नेते करताहेत. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याची देखील चर्चा आहे.