राज भवनाऐवजी विधान भवनात होणार शपथविधी सोहळा

येत्या ३० डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता 

Updated: Dec 26, 2019, 03:40 PM IST
राज भवनाऐवजी विधान भवनात होणार शपथविधी सोहळा title=

मुंबई : येत्या ३० डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. नव्या ३६ मंत्र्यांचा हा शपथविधी सोहळा राज भवनाऐवजी विधान भवनात पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला मंत्र्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते, आमदार तसंच राजकीय नेते असा मोठा लवाजमा उपस्थित राहणार असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं हा बदल करण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्याची तयारी विधान भवनात सुरु झाली आहे.

३० डिसेंबरला दुपारी १ वाजता हा शपथविधी होणार असल्याचं कळतं आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांची नावं निश्चित न झाल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढं ढकलण्यात आला होता. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी तयार आहे. मात्र काँग्रेसकडून अजून नावंच आली नसल्यानं मंत्रिमंडळाचा विस्तार पुढं ढकलण्यात आल्याचं या भेटीनंतर समोर आलं होतं.

महाविकासाघाडीच्या या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री (एकूण १३ मंत्री) आणि काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता पुढचं पाऊल टाकणार आहे. मुख्यमंत्र्यांसह ७ मंत्र्यांचा शपथविधी गेल्या २८ नोव्हेंबरला पार पडला होता. नागपूर अधिवेशनात या ७ मंत्र्यांनीच राज्यकारभार चालवला होता.

संभाव्य यादी

राष्ट्रवादी

राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मश्रीफ, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील, सरोज अहिरे आणि डॉ. किरण लहामटे यांच्या नावाचा समावेश आहे.

काँग्रेस

काँग्रेस मंत्र्यांची अंतिम यादी नवी दिल्लीत निश्चित होते आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, यांच्यासह विजय वडेट्टीवार, के सी पाडवी, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सुनील केदार, वर्षा गायकवाड, अमिन पटेल आणि प्रणिती शिंदे यांचा संभाव्य मंत्र्यांमध्ये समावेश आहे.

शिवसेना

उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कुणाकुणाची वर्णी लागते, याचीही चर्चा रंगली आहे. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये रविंद्र वायकर, उदय सामंत, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, आशिष जैस्वाल, संजय राठोड, दादा भुसे, दिवाकर रावते, अनिल परब, डॉ. राहुल पाटील, संजय शिरसाट, अनिल बाबर आणि शंभूराज देसाई-पाटण यांचा समावेश आहे.