आज आमच्यावर आलेली वेळ उद्या शिवसेनेवरही येईल- जयंत पाटील

आज आम्ही जात्यात आहोत, ते सुपात आहेत.

Updated: Sep 27, 2019, 04:45 PM IST
आज आमच्यावर आलेली वेळ उद्या शिवसेनेवरही येईल- जयंत पाटील title=

मुंबई: भाजप विरोधकांना संपवण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये सापडली आहे. मात्र, उद्या शिवसेनेवरही हीच वेळ येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिला. त्यांनी शुक्रवारी 'झी २४ तास'शी संवाद साधताना म्हटले की, भाजप विरोधकांना संपवण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यावेळी भाजपचा डाव उधळला गेला. परंतु आज राष्ट्रवादीवर आलेली वेळ उद्या शिवसेनेवरही येईल. आज आम्ही जात्यात आहोत, ते सुपात आहेत. मात्र, भविष्यात शिवसेनेलाही अशा संकटांचा सामना करावा लागेल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

शरद पवार यांनी 'ईडी'ला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दाखवली होती. परंतु, ईडीला शरद पवारांना काय प्रश्न विचारायचे हेच माहिती नव्हते. त्यांनी गृहपाठ न करता पवारांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये पवारांना गोवण्याचा भाजपचा डाव होता. मात्र, हा डाव उधळला गेला, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नुकताच शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, आपण राज्य सहकारी बँकेचे सभासद आणि संचालक नसतानाही आपल्यावर गुन्हा का दाखल झाला, याचा जाब विचारण्यासाठी शरद पवार शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात जाणार होते. 

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांच्याकडून शुक्रवारी मुंबईतील 'ईडी'च्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. ही सगळी परिस्थिती पाहता 'ईडी'ने शरद पवार यांना तुर्तास चौकशीसाठी येण्याची गरज नसल्याचे ईमेलवरून कळवले. याशिवाय, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनीही पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची मनधरणी केली. अखेर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून शरद पवार यांनी 'ईडी'च्या कार्यालयात जाण्याचा निर्णय मागे घेतला होता.