खासगी रुग्णालयांना चाप, प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथके नियुक्त करण्याचे आदेश

खासगी रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची लूट थांबवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

Updated: Aug 7, 2020, 04:30 PM IST
खासगी रुग्णालयांना चाप, प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथके नियुक्त करण्याचे आदेश title=

दीपक भातुसे, मुंबई : कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या भीतीचा गैरफायदा खासगी रुग्णालये घेत आहेत. कोरोना रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिलं आकारली जात आहेत. पण आता कोरोना काळात रुग्णांची लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांना चाप बसणार आहे. कारण प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथके नियुक्त करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. 

भरारी पथकांनी अचानक खाजगी रुग्णालयांना भेट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खाजगी रुग्णालयांवर अंकुश ठेवण्यासाठी आरोग्य विभागाचे हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना आरोग्य विभागाने याबाबत आदेश दिले आहेत.

सर्व महापालिका आणि जिल्ह्यामध्ये भरारी पथक नेमण्यात येणार असून आता रुग्णांची होणारी लूट थांबवली जाणार आहे. ही भरारी पथकं अचानक खासगी रुग्णालयांना भेट देऊन पाहणी करु शकतील. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी आणि महापालिका आयुक्तांनीही स्वतः आपल्या विभागातील किमान पाच खासगी रुग्णालयांना अचानक भेट देऊन पाहणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.