हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : पालघर (Palghar News) जिल्हा परिषदेचे सदस्य हबीब शेख यांनी शासनाच्या केलेल्या फसवणूक प्रकरणी न्यायालयाने त्याला 23 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हबीब शेख याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांच्या नावे बनावट लेटर पॅड आणि बनावट सही करून शासनाची 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे .
पालघर जिल्हा परिषदेच्या मोखाड्यातील आसे जिल्हा परिषद गटातील हबीब शेख हे सदस्य असून ते पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी देखील आहेत . खासदार राजेंद्र गावित यांनी दिलेल्या तक्रारीवरून पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शनिवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेने हबीब शेख यांना अटक केली आहे.
मोखाडा विभागातील मोखाडा खोडाळा विहिगाव राज्य मार्ग 78 या रस्त्यासाठी खासदार राजेंद्र गावित यांनी शासनाकडून दहा कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने मंजुरी देखील दिली होती. मात्र पाठपुरावा करताना या आधीच खासदारांच्या लेटर पॅड आणि त्यांच्या सहीचे पत्र शासनाकडे जमा झाल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगताच ही कागदपत्रे आणि या कागदपत्रांवरील आपली सही बनावट असल्याचे सांगत खासदार गावित यांनी पोलिसांत धाव घेतली.
खासदार राजेंद्र गावित यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे जव्हार मोखाडा विक्रमगड या परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा सुरू असलेला भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे . विशेष म्हणजे खासदारांच्या नावेच अशी बनावट कागदपत्र सादर केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय खासदारांची लेटर पॅड आणि सही दाखवून हबीब शेख यांनी थेट मुख्यमंत्र्यांची देखील या पत्रावर सही घेतल्याचं बोललं जातंय. सध्या हबीब शेख हे पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे. हबीब शेख यांना झालेली अटक राष्ट्रवादी काँग्रेससह निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेला मोठा धक्का मानला जातोय .
मी याला बळी पडणार नाही - खासदार राजेंद्र गावित
"हबीब शेख म्हणतोय की त्याच्या वरिष्ठांनी सांगितले आहे. आता त्याचा वरिष्ठ जिजाऊ संघटेना निलेश सांबरे हा आहे. परंतु प्रथमदर्शनी हबीब शेखने हा गुन्हा केलेला आहे. जव्हार मोखाड्यामध्ये अनेक ठेकेदार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कामं मिळवत आहेत. असे ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत. ही वस्तुस्थिती आहे की याआधीसुद्धा खासदार आमदारांची खोटी सही लेटर पॅडवर घेऊन कामे केली जात होती. पण मी सुशिक्षित खासदार आहे. कामाच्या दर्जाच्या संदर्भात, निधी संदर्भात मला चांगली कल्पना आहे. कुठले काम कुठल्या पद्धतीने करायचे याची मला माहिती आहे. पण मी याला बळी पडणार नाही," असे खासदार राजेंद्र गाविक यांनी सांगितले.