परमबीर सिंग यांच्यावर आणखी एक लेटरबॉम्ब, निवृत्त एसीपींचा गंभीर आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी भर पडलीय

Updated: Nov 25, 2021, 06:47 PM IST
परमबीर सिंग यांच्यावर आणखी एक लेटरबॉम्ब, निवृत्त एसीपींचा गंभीर आरोप

ऋचा वझे, झी 24 तास, मुंबई : खंडणीच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या अडचणीत आणखी भर पडलीय. निवृत्त एसीपी समशेर पठाण (Samsher Pathan) यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 26/11 मधील दहशतवाद्यांविरोधातला (26/11 Mumbai Terror Attack) महत्त्वाचा पुरावा असलेला मोबाईलच परमबीर सिंग यांनी नष्ट केल्याचं आपल्या पत्रात समशेर पठाण यांनी म्हंटलं आहे. 

समशेर पटाण यांच्या पत्रात काय?
26/11च्या हल्ल्यावेळी परमबीर सिंग हे एटीएसमध्ये कार्यरत होते. त्यावेळी परमबीर सिंग यांनी दहशतवादी अजमल कसाबचा (Ajmal Kasab) मोबाइल स्वत:कडे ठेवून घेतला होता. आजतागायत तो कसाबचा मोबाईल तपास यंत्रणेच्या हाती लागलेला नाही. 

पुढे या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतरही त्यांनी तो मोबाईल क्राइम ब्रँचकडे सोपवला नाही. त्यामुळे दहशतवादी कसाबविरोधातले पुरावे नष्ट केल्याप्रकरणी परमबीर सिंग यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ

पठाण यांच्या लेटरबॉम्बमुळे परमबीर सिंह चांगलेच अडचणीत आलेत. आधीच त्यांच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये 5 गुन्हे दाखल झाले आहेत. त्याता आता कसाब प्रकरणाची भर पडलीय. या आरोपांमुळे पोलिस दलातही गुन्हेगारी किती खोलवर रूजलीय हे स्पष्ट होतंय.