मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी (Rashmi Shukla Phone Tapping Case) मुंबई पोलिसांनी संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. संजय राऊत यांना आता पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे. संजय राऊत यांना कुलाबा पोलीस ठाण्याच्यावतीने समन्स बजावण्यात आले आहे.
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी गुरुवारीच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आपला जबाब नोंदवला होता. मात्र, संजय राऊत यांना पोलिसांनी कधी बोलावले हे अद्याप समजू शकलेले नाही. संजय राऊत यांना पोलीस ठाण्यात कधी हजर व्हावे लागणार, ही तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. समन्स मिळाल्यानंतर संजय राऊत यांना कुलाबा पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मार्चमध्ये कुलाबा पोलीस ठाण्यात IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांनी एकनाथ खडसे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचे क्रमांक वॉचलिस्टमध्ये टाकल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या (SID) प्रमुख असताना कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. तक्रारीनुसार, खडसे भाजपमध्ये असताना त्यांचा फोन 2019 मध्ये दोनदा टॅप करण्यात आला होता. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेदरम्यान खडसे यांच्याशिवाय शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोनही नोव्हेंबर 2019मध्ये टॅप करण्यात आला होता. त्यांनी सांगितले की एसीपी (विशेष शाखा) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.