Mumbai News : कांदेपोहे, हा अनेकांचाच आवडीचा न्याहारीचा (Breakfast) पदार्थ. त्यातही (Mumbai) मुंबईकरांची या पदार्थाला विशेष पसंती. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत सरासरी दर किलोमीटरवर कांदेपोहे आणि नाश्ता विकणाऱ्यांचे स्टॉल्स पाहायला मिळतात. या स्टॉल्सवर कामाला निघालेल्या अनेक चाकरमान्यांची गर्दी पाहायला मिळते. घाईगडबडीत असतानाही हे पोहे खाल्ल्यावाचून काही मुंबईकरांचा दिवस सुरु होत नाही, असं म्हणणं इथं गैर ठरणार नाही. पण, येत्या काही दिवसांमध्ये ही परिस्थिती बदलू शकते. कारण ठरेल ते म्हणजे पोह्यांचे वाढलेले दर.
मुंबईरांच्या खिशाला पुन्हा एकदा फटका बसणार आहे. कारण, एक प्लेट कांदे पोह्यासाठी (Kande pohe) त्यांना आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. पोह्यांच्या किमतीत 10 ते 20 रुपयांनी वाढ झाल्यामुळं ही वेळ आली आहे.
किराणा मालाच्या दुकानात चांगल्या दर्जाच्या पातळ पोह्याचा दर 80 रुपये तर जाड पोह्याचा दर 60 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. तांदळाच्या दरात वाढ झाल्यामुळं पोह्यांचे दरही वाढले आहेत. त्यातच मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानंही पोह्यांच्या दरांवर याचे थेट परिणाम झाले आहेत. परिणामी आता हॉटेल आणि स्टॉलवर मिळणारी 20 ते 25 रुपयांची पोह्याची डिश आता थेट 5 ते 10 रुपयांनी महाग मिळणार आहे. तेव्हा इथून पुढे पोहे खाण्यासाठी जात असाल तर जास्तीचे पैसे सोबत ठेवा.
गेल्या वर्षभराचा आढावा घ्यायचा झाल्यास पोह्यांचे दर 10 ते 20 रुपयांनी वाढले आहेत. यामध्ये रशिया- युक्रेन युद्धाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण, या युद्धापासूनच महागाईच्या झळा संपूर्ण जगभरात जाणवू लागल्या आहेत. याचेच परिणाम म्हणजे तांदूळ आणि पोह्यांचे वाढलेले दर.
पोहे महागण्याचं आणखी एक कारण म्हणजे पोहे किंवा मुरमुरे तयार करण्यासाठी गरजेचा असणारा कच्चा माल म्हणजेच धानाचं उत्पन्न कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. ज्यामुळं हे दर कडाडले आहेत.