Maharashtra Assembly Election: नागपूरमध्ये बुधवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातामधून काँग्रेसचे नेते नितीन राऊत थोडक्यात बचावले. नितीन राऊत यांच्या वाहनाला बुधवारी रात्री ऑटोमोटीव्ह चौकावर अपघात झाला. नितीन राऊत प्रचार संपून त्यांच्या घराकडे जात असताना एका ट्रकने त्यांच्या चारचाकी वाहनाला मागून जोरदार धडक दिली. ही धडक कारच्या दरवाजाजवळ बसली. मात्र सुदैवाने कारचालकाने प्रसंगावधान दाखवत नियंत्रण कायम ठेवल्याने कार पलटली नाही.
कारला अचानक धडक बसल्याने कारमध्ये बसलेले नितीन राऊत आणि इतर सहकाऱ्यांना जोरदार धक्का बसला. मात्र या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. नितीन राऊत हेही या अपघातातून बचावले असून ते सुखरूप आहेत. अपघातानंतर राऊत यांच्या सहकाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलीस या प्रकरणामध्ये अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, नागपूर शहरामध्येच तहसील पोलिसांनी बुधवारी रात्री एक मोठी कारवाई करत 1 कोटी 35 लाख रुपये जप्त केले आहेत. तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेंट्रल एव्हन्यू रोडवरुन जात असताना मोपेडवरून बॅगेत रक्कम घेऊन जाणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शाकीर हाजी नासिर खान असं रक्कम घेऊ जात असलेल्या आणि ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी यानुसार फौजफाटा तैनात केला होता. रात्रीच्या सुमारास मोपेडवरुन जाणाऱ्या संक्षयिताच्या हलचालींबद्दल शंका वाटल्याने त्याला थांबवून पोलिसांनी तपासणी केली. आधी सदर इसम पोलिसांना उडवा उडवीचे उत्तर देत होता.
नक्की वाचा >> मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...
ही रक्कम नेमकी कुठून आणली आणि कुठे नेत आहे याची समाधानकारक उत्तरं शाकीर हाजी नासिर खानला देता आली नाही. त्यामुळेच पोलिसांनी रक्कम ताब्यात घेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडे सोपवली आहे. ही रोकड नेमकी कोणाची यासंदर्भात उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. बांधकाम व्यवसायीकाकडे ही रक्कम घेऊन जात असल्याचा दावा शाकीर हाजी नासिर खान करत होता. मात्र पोलीस सर्वच बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहे.
मागील काही आठवड्यांमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवगेळ्या ठिकाणी अशाप्रकारे रोख रक्कम जप्तीच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी तर सोनं आणि चांदीही सापडली आहे.