अस्तनीतील निखाऱ्यांपासून सावध राहा; शिवसेनेचा अनिल देशमुखांना सल्ला

जर एखाद्या मंत्र्यास असे वाटत असेल की, अधिकारी सरकार पाडत आहेत तर ते सरकार अत्यंत ढिसाळ पायावर उभे आहे, असे जनतेला वाटू शकते.

Updated: Sep 21, 2020, 08:48 AM IST
अस्तनीतील निखाऱ्यांपासून सावध राहा; शिवसेनेचा अनिल देशमुखांना सल्ला

मुंबई: राज्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकारी महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, वेळीच तो डाव हाणून पाडण्यात आला, अशा आशयाचे विधान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून गृहखात्याला अस्तनीतल्या निखाऱ्यांपासून सावध राहण्याबरोबरच जपून बोलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अधिकारी वर्ग हा प्रोफेशनल आहे. सरकार बदलण्याची किंवा पाडण्याची क्षमता त्यांच्यात नाही. राज्याची ती परंपरा नाही. जर एखाद्या मंत्र्यास असे वाटत असेल की, अधिकारी सरकार पाडत आहेत तर ते सरकार अत्यंत ढिसाळ पायावर उभे आहे, असे जनतेला वाटू शकते, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

पोलीस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न; गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट

राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, या अनिल देशमुखांच्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, देशमुख यांनी कालच तात्काळ पत्रकारपरिषद घेत आपण असे वक्तव्य केल्याचा साफ इन्कार केला होता. मी असे काहीही मी बोललेलो नाही. ते वाक्य माझ्या तोंडी टाकण्यात आले. तुम्ही माझी ती मुलाखत पाहू शकता, असे देशमुख यांनी सांगितले होते. 

मात्र, यानंतरही राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारला कमजोर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा संशय शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच भाजपशी सलगी असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही शिवसेनेकडून फटकारण्यात आले आहे. फडणवीस सरकार जाणारच नाहीत, या भ्रमात प्रशासन निवडणुकीआधी आणि नंतर काही काळ होते. पाच वर्षे फडणवीस आणि भाजपने प्रशासनावर एकछत्री अंमल गाजवला. त्यामुळे पोलीस असतील किंवा मंत्रालय, महसूल खाते एकजात सर्व अधिकारी वर्ग त्याच संघधुंदीत गुंग झाला होता. अनेक महत्त्वाच्या नेमणुका संघ परिवाराच्या हस्तक्षेपाने होत असत. पोलीस अधिकारी, आयुक्त, सरकारी वकिलांच्या नेमणुकांत हे सर्रास घडत होते. मात्र, १०५ आमदारांची ताकद असूनही भाजप सरकार बनवू शकला नाही, हे सत्य स्वीकारायला भाजपच्या सहानुभूतीदारांना वेळ लागला. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी पहाटे जो सरकार स्थापनेचा सोहळा पार पडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाट्य वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले, असा आरोपही शिवसेनेने केला आहे.