मुंबई काँग्रेसमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता; निरुपम यांना हटविण्यासाठी जोरदार हालचाली

प्रमुख नेत्यांनी मागितली राहुल गांधींच्या भेटीची वेळ

Updated: Sep 16, 2018, 06:32 PM IST
मुंबई काँग्रेसमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता; निरुपम यांना हटविण्यासाठी जोरदार हालचाली title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी महाआघाडी स्थापन करण्याचे मनसुबे रचणाऱ्या काँग्रेसमधील अंतर्गत वाट पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मुंबई काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वबदलासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष संजय निरूपम यांना पदावरून हटवण्यासाठी मिलिंद देवरा गट आणि गुरुदास कामत समर्थकांनी जोरदार आघाडी उघडली आहे. 

यासंदर्भात जनार्दन चांदुरकर, भाई जगताप, एकनाथ गायकवाड, नसिम खान, सुरेश शेट्टी, बाबा सिद्दीकी, कृपाशंकर सिंग, अमिन पटेल या प्रमुख नेत्यांनी नुकतीच राज्य काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीत संजय निरूपम यांना पदावरून दूर करण्यासंबंधीचा प्रस्ताव खरगेंपुढे मांडण्यात आला. निरूपम यांच्याऐवजी मिलिंद देवरा यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात यावीत, असा या नेत्यांचा आग्रह आहे. 

काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांच्या समर्थकांनीही मिलिंद देवरा यांना अध्यक्ष करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख नेत्यांनी राहुल गांधींच्या भेटीची वेळ मागितली आहे. मिलिंद देवरा यांचे नेतृत्व सर्वसमावेशक आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील सर्व गटातटांना देवरा एकत्र बांधून ठेवतील, असे या नेत्यांनी सांगितले.