मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या शब्दात टीका करणाऱ्या भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुंबईत पोस्टरबाजी केली आहे. रविवारी मुंबईत सीएम चषक युवा महासंगम या क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलताना पूनम महाजन यांनी महाआघाडीवर बोलताना शरद पवार यांचा उल्लेख 'महाभारतातील शकुनी मामा' आणि 'रामायणातील मंथरा' असा केला होता. पवारांवर केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पूनम महाजन यांच्यावर वैयक्तिक टीका करणारी पोस्टरबाजी मुंबईत केली आहे.
'रामायण, महाभारत यांचे कथानक राहू द्या, प्रविण महाजन यांनी प्रमोद महाजन यांना का मारले? हे देशातील जनता जाणू इच्छिते' अशा प्रकारचे पोस्टर राष्ट्रवादीने पूनम महाजन यांच्या मुंबईतील घरासमोर आणि मुंबईभर लावले आहेत.
भाजप खासदार आणि भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष पूनम महाजन यांनी शरद पवार यांना 'रामायणातील मंथरा' म्हणतानाच तर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांची तुलना करीना-सैफचा मुलगा 'तैमूर'शी केली होती. भाजपविरोधात उभं राहिलेलं 'महागठबंधन' नाही तर महा'ठग'बंधन असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं.
राजकारणात सुसंस्कृतपणा जपणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे @poonam_mahajan तुम्ही हि ती जपाल हि अपेक्षा @BJPYUVAMORCHA @bjpmaha @NCPspeaks @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil @CMOMaharashtra @ANI pic.twitter.com/RGXKS3A9pY
— Chitra Kishor Wagh (@chitrancp) February 4, 2019
पूनम महाजन यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी टीका केली होती. 'राजकारणात सुसंस्कृतपणा जपणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे' असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. वडिलांच्या नावावर पूनम महाजन निवडून आल्याचं त्या विसरल्याचीही टीका चित्रा वाघ यांनी केली होती.