मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ज्या कॉकटेल अँटीबॉटीजनं ( cocktail antibodies ) उपचार झाले. त्याचा प्रयोग मुंबईत देखील यशस्वी झाला आहे. कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन अँटीबॉडी औषध मिश्रणाचा प्राथमिक प्रयोग मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात २०० पेक्षा अधिक रुग्णांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ( BMC ) वतीने करण्यात आला होता.
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या ( Corona Third Wave ) पार्श्वभूमीवर या औषध मिश्रणाचा यशस्वी प्रयोग दिलासा देणारा आहे.
कोविडबाधितांवर उपचारांसाठी अमेरिकेमध्ये नोव्हेंबर २०२० पासून कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा उपयोग करण्यात येत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोविड बाधित झाल्यानंतर त्यांना देखील हेच मिश्रित औषधोपचार देण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये अत्यंत वेगाने सुधारणा झाली.