मुंबई : राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपती निवडीचा मार्ग मोकळा झालाय.
राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या पाठिंबा देण्याबाबत आज मातोश्रीवर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. त्यामुळे एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत एकमत झाले. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर केली.
राष्ट्रपतीपदासाठी एनएडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झाल्यावर आता कोविंद यांचा विजय जवळपास निश्चित मानला जाऊ लागला आहे. आता शिवसेनेने पाठिंबा दिल्याने मार्ग मोकळा झालाय.
रामनाथ कोविंद यांना एनडीएतील घटकपक्षांनी पाठिंबा दिला आहेच. त्याचबरोबर दक्षिणतील राज्यांनी कोविंद यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात तेलंगाचे सत्ताधारी टीआरएस आंध्रप्रदेशातला प्रमुख पक्ष असणारा जगन रेड्डींचा वायएसआर काँग्रेस यांचा समावेश आहे.
राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी एनडीएला आपला उमेदवार निवडणूक आणण्यासाठी आवश्यक असणारी ५१ टक्के मतं जुळवावी लागणार होती. काल अमित शाहांनी कोविंद यांची उमेदवारी जाहीर केल्यावर चित्र एकदम पालटले.