राहुल गांधींनी कान टोचल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी दूर, कोणी घेतली माघार?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कान टोचल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी दूर होण्याच्या मार्गावर आहे. 

Updated: Mar 2, 2019, 08:52 PM IST
राहुल गांधींनी कान टोचल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी दूर, कोणी घेतली माघार? title=

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कान टोचल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी दूर होण्याच्या मार्गावर आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून कृपाशंकर सिंह यांनी आपली दावेदारी मागे घेतली आहे. तर प्रिया दत्त यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई काँग्रेसमधील वाद आणि गटबाजी मिटवण्याचे आदेश राहुल गांधींनी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत हेवेदावे बाजूला सारून सर्व नेत्यांनी एकोप्याने काम करावे, अशा सूचना राहुल गांधी यांनी संजय निरुपम आणि मिलिंद देवरा गटाला दिल्या होत्या. 

कृपाशंकर सिंह यांनी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघावरचा आपला दावा मागे घेतलाय. त्यामुळे आता तिथून लढण्याचा प्रिया दत्त यांचा मार्ग मोकळा झाला आहे. काल झालेल्या सभेत गांधी यांनी मुंबईतल्या पक्षाच्या नेत्यांना वाद मिटवण्याबाबत तंबी दिली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत हेवेदावे बाजूला सारून सर्व नेत्यांनी एकोप्याने काम करावे, अशा सूचना त्यांनी संजय निरुपम आणि मिलिंद देवरा गटाला दिल्या. मुंबईतील जाहीर सभेसाठी आले असताना राहुल गांधींनी प्रिया दत्त, मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, कृपाशंकर सिंह, जनार्दन चांदूरकर, भालचंद्र मुणगेकर यांच्याशी संवाद साधला. आपला दावा मागे घेताना कृपाशंकर सिंह यांनी जनतेपर्यंत पोहोचायला कमी दिवस राहिले असल्याचे कारण पुढे केलं असले तरी राहुल गांधींनी केलेल्या कानउघडणी नंतरच त्यांना उपरती झाल्याचे स्पष्ट आहे. 

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडीत यावं यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी आंबेडकरांच्या भेटीसाठी अनुकूल आहेत. दरम्यान, आंबेडकरांच्या सर्व अटी मान्य करण्याची लेखी हमी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिली.