Megablock : मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक, मुंबईकरांनो बाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक तपासा

Mumbai Local Mega Block : आज ऐन सुट्टीच्या दिवशी मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेवर तांत्रिक दुरुस्तीसाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी लोकल प्रवाशांना आज गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 23, 2023, 09:06 AM IST
Megablock : मध्य रेल्वेचा आज मेगाब्लॉक, मुंबईकरांनो बाहेर पडण्याआधी लोकलचे वेळापत्रक तपासा title=
Mumbai Local Mega Block

Railway Mega Block : रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखरुप व्हावा यासाठी रेल्वेकडून प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येतो. यामध्ये लोकलच्या रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती अशी अनेक कामे  मेगाब्लॉकदरम्यान करण्यात येते. याचपार्श्वभूमीवर आज (23 एप्रिल 2023) मुंबईतील उपनगरीय आणि हार्बर मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक (railway megablock) घेण्यात येणार आहे. याचा परिणाम लोकल वाहतुकीवर होणार आहे असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रेल्वेने मेगाब्लॉक घेतला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी-वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. याशिवाय चुनाभट्टी-वांद्रे-छत्रपती सीएसएमटी-अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

वाचा : राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता, एप्रिल अखेरपर्यंत पावसाचा अंदाज 

मध्य रेल्वेवर 

मुंबईहून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत धीम्या मार्गाने सुटणाऱ्या गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकावर थांबतील. तसेच या लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील. 

हार्बर मार्गावर 

सीएसएमटी-वडाळा-वाशी-बेलापूर-पनवेल-वांद्रे-गोरेगाव या डाउन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रविवारी रद्द राहतील. मेगाब्लॉक दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची मुभा असेल. 

पश्चिम रेल्वेवर खोळंबा

पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकादरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकलची वाहतूक विस्कळीत झाली. या गडबडीमुळे शेकडो प्रवासी लोकलमध्ये अडकले आहेत. ही घटना शनिवारी (23 एप्रिल 2023) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे कार्यालयातून घरी जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.