राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल, म्हणाले बाळासाहेबांचं ऐकणार की शरद पवारांचं?

राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम. कार्यकर्त्यांची धरपकड सुरु झाली आहे.

Updated: May 3, 2022, 08:41 PM IST
राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल, म्हणाले बाळासाहेबांचं ऐकणार की शरद पवारांचं? title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पत्र जारी करत पुन्हा एकदा आपली भूमिका जाहीर केली आहे. राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम दिसत आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे. राज ठाकरे भोंग्याच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक दिसत आहेत. (Raj Thackeray open letter on Loudspeaker)

राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं की, 'महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी "सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत" हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे.'

'देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल! हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे. माझ्या हिंदू वांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या. आता नाही, तर कधीच नाही. असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांच्या या आवाहनानंतर आता राज्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे. 4 मे रोजी मुंबई सह राज्यातील सर्व मशिदीबाहेर तणाव वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर आता अनेक नेत्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याची शक्यता आहे. अनेक मनसे पदाधिकारी नॉट रिचेबल आहेत. त्यांचा शोध देखील सुरु झाला आहे.