रुचा वझे / मुंबई : Mumbai Delhi Rajdhani Express : राजधानीचा रुबाब लयभारी. मुंबई ते दिल्लीपर्यंत अत्यंत वेगाने प्रवास घडवणारी अशी या गाडीची खरी ओळख. नेहमीच या गाडीला मोठी गर्दी असते. हाऊसफुल्लचा बोर्ड आपल्या नावे मिरवणारी राजधानी एक्स्प्रेस आता 50 वर्षांची झाली आहे. मुंबई ते दिल्ली प्रवास करायचा म्हणजे राजधानी एक्सप्रेसनेच, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. कारण वेळ वाचतो आणि दिमागदार प्रवास होतो. आज हीच राजधानी एक्स्प्रेस 50 वर्षांची झाली आहे. राजधानीचा दिमाखदार सोहळा काल मुंबई सेंट्रल स्थानकात पार पडला.
17 मे 1972 साली पहिल्यांदा राजधानी एक्स्प्रेस मुंबईहून दिल्लीसाठी सुरु झाली. देशाची राजधानी दिल्ली येथे घेऊन जाणारी राजधानी एक्स्प्रेस. तेव्हा ही राजधानी एक्स्प्रेस सुपरफास्ट म्हणून ओळखली जायची. सर्व मेल एक्स्प्रेसमध्ये राजधानी एक्स्प्रेस सर्वात जास्त गतीने धावायची. मुंबई ते दिल्ली 20 तास हा प्रवास असायचा. कालांतराने अनेक राजधानी पेक्षा जास्त गतीने धावणाऱ्या इतर एक्स्प्रेस आल्या आणि राजधानी तशीच राहिली.
तरी आता गेल्याकाही वर्षात राजधानीची गती वाढली आहे. आता राजधानीमधून दिल्लीला पोहचायला 15 तास लागत आहेत. हाच प्रवास 12 तास पूर्ण होण्याचा रेल्वे विभागाचा प्रयत्न आहे. आज नक्कीच रेल्वेच्या इतिहासात महत्वाचा दिवस म्हणावा लागेल कारण, अजूनही तेवढाच आरामदायी, सुखकर प्रवास देणारी राजधानी एक्स्प्रेस 50 वर्षांची जरी झाली असली तरी दिवसेंदिवस यंग होत चालली आहे. आज राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी ही आनंद व्यक्त केलाय. रेल्वेच्या इतिहासात अशाच सुवर्ण क्षणांची 50 वर्षांची भर पडली आहे.