Rajyasabha Election : सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच

कागदावर सोपी असलेली राज्यसभेची निवडणूक प्रत्यक्षात शिवसेनेसाठी जड जाणार? पाहा कशी आहेत गणितं

Updated: Jun 3, 2022, 08:53 PM IST
Rajyasabha Election : सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यसभेच्या (Rajyasabha Election)  6 जागांसाठी 7  उमेदवार रिंगणात असून येत्या 10 जूनला राज्यसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.
 
राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात महाविकास आघाडीनं विधान परिषदेची एक जादा जागा भाजपला सोडण्याची तयारी दर्शवली. पण भाजपनं सत्ताधारी आघाडीचा ही ऑफर धुडकावून लावली. त्यामुळं आता सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार विरुद्ध भाजपचे धनंजय महाडिक या दोन कोल्हापूरकर पैलवानांमध्ये राजकीय कुस्तीचा आखाडा रंगणार आहे.

कसं असणार गणित?
पहिल्या दोन उमेदवारांना विजयी होण्याइतकी मते देवून भाजपकडे 28 मते अतिरिक्त राहतात. त्यामुळं तिसरे उमेदवारे धनंजय महाडिकांना निवडून आणण्यासाठी भाजपला पहिल्या पसंतीची आणखी 14 मतांची गरज 

 तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडे तीन उमेदवारांना देवून 38 अतिरिक्त मते शिल्लक राहतात. म्हणजे शिवसेनेच्या संजय पवार यांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 4 मतांची गरज आहे. 

पण सहाव्या उमेदवाराने पहिल्या पसंतीच्या 42 मतांचा कोटा पूर्ण न केल्यास मग मात्र दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागणारेत. ही मते मोजताना अगोदरच्या पाच उमेदवारांपैकी सर्वाधिक जास्त मते ज्या विजयी उमेदवारांने मिळवली आहेत. त्याची दुसऱ्या क्रमांकाची मते मोजली जातात. म्हणजे भाजपच्या एखाद्या विजयी उमेदवाराची मते समजा 46 आहेत आणि इतर उमेदवारांची मते त्यापेक्षा कमी आहेत. तर भाजपच्या त्या विजयी उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातील.  

एकीकडं 42 मतांचा कोटाही गाठायचाय आणि दुसरीकडं दुसऱ्या पसंतीची मते आपल्याच उमेदवाराची मोजली जावीत,याकरता अगोदरच्या उमेदवारांना 42 पेक्षा जास्त मतेही द्यायची आहेत. म्हणून भाजप आणि महाविकास आघाडीला अशी तारेवरची कसरत करावी लागणाराय.

सध्या तरी भाजप आणि शिवसेनेची सारी मदार ही तटस्थ असलेले छोटे पक्ष आणि अपक्षांवर असणार आहे.

भाजपच्या पाठिशी कोण?
 भाजपचे १०६ 
भाजपला पाठिंबा देणारे छोटे पक्ष व अपक्ष आमदार-७ 

१. रासपचे राहूल कूल  २. जनसुराज्यचे विनय कोरे ३ .रवी राणा ४. प्रकाश आवाडे ५. राजेंद्र राऊत ६. रत्नाकर गुट्टे  ७. महेश बालदी,उरण असे एकूण 113 (भाजप आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्यानं येणार नाहीत. त्यामुळं 112) दोन उमेदवारांना 84 मते दिल्यानंतर 28 मते शिल्लक राहतात. धनंजय महाडिकांना विजयासाठी पहिल्या पसंतीची आणखी 14 मतांची गरज आहे.

 महाविकास आघाडीचं गणित
शिवसेना 55, राष्ट्रवादी काँग्रेस 53, काँग्रेस 44, सपा 2, प्रहार 2, स्वाभिमानी शेतकरी 1 आणि मविआ समर्थक इतर आमदार 9

१. शंकरराव गडाख  २. राजेंद्र पाटील येड्रावकर ३.मंजुषा गावित ४. गिता जैन  ५. आशिष जयस्वाल  ६. किशोर जोरगेवार  ७. चंद्रकांत पाटील  ८. विनोद अगरवाल,गोंदिया  ९. संजय शिंदे,करमाळा अशी एकूण 166 मतं मविआकडे आहेत. 

नवाब मलिक व अनिल देशमुख यांना कोर्टाने मतदान करण्यास परवानगी न दिल्यास मविआकडे 164 मतं असतील. 164 आकडा धरल्यास 3 उमेदवारांना प्रत्येकी 42 मते दिल्यानंतर महाविकास आघाडीकडे 38 मते शिल्लक राहतात. म्हणजे विजयासाठी 3 मतांची गरज भासणार आहे. 

त्यामुळे तटस्थ असणाऱ्या 8 मतांवर भाजप आणि मविआची मदार असणार आहे.

एकूण तटस्थ 8

बहुजन विकास आघाडी 3, शेकाप 1, एमआयएम 2, माकप 1 आणि मनसे 1 अशी एकूण आठ मतं कोणाला मिळणार यावर भाजप आणि मविआची मदार असणार आहे.