मुंबई : 2010 साली विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे 3 उमेदवार निवडून येणार होते. पण, इतर पक्षांची मतं फोडून कॉंग्रेसने चौथा उमेदवार निवडून आणला. तेव्हा मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला अशी चर्चा होती. तीच चर्चा आताही होऊ लागली आहे. मात्र, आता निमित्त आहे ते राज्यसभा निवडणुकीचे.
राज्यसभेच्या निवडणुकीत सहा जागा असताना भाजपने तीन, शिवसेनेने दोन, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक याप्रमाणे तीन उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये मतांसाठी 'कांटे की टक्कर' आहे.
10 जूनला ही निवडणूक होतेय. विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक आणि भाजपचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात. तर सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपने या निवडणुकीत आणखी एक उमेदवार दिला आहे. मात्र, दोघांकडही आवश्यक मते नाहीत त्यामुळे अपक्ष आमदारांवर त्यांची मदार अवलंबून आहे.
विधानसभेत बहुजन विकास आघाडी ( 3 ), समाजवादी पार्टी ( 2 ), एमआयएम ( 2 ), प्रहार जनशक्ती पक्ष ( 2), कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे, राष्ट्रीय समाज पक्ष, क्रांतीकारी शेतकरी पक्ष, जनसुराज्य शक्ती, शेतकरी कामगार पक्ष यांचे प्रत्येकी एक आमदार असे मिळून 16 आणि 13 अपक्ष
असे एकूण 29 आमदार आहेत.
अपक्ष आणि छोटे पक्ष मिळून या 29 आमदारांपैकी महाविकास आघाडीकडे बहुजन विकास आघाडी (3), समाजवादी पक्ष (2) , प्रहार जनशक्ती पक्ष (2), स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, क्रांतीकारी शेतकरी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह 8 अपक्ष आमदारांचे पाठबळ आहे. यामुळे महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदारांचे संख्याबळ आहे.
तर भाजपसोबत जनसुराज्य पक्ष (1), राष्ट्रीय समाज पक्ष (1) आणि 5 अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे भाजपकडे 113 आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्यावेळेस बहुमताचा आकडा सिद्ध करताना महाविकास आघाडीकडे 172 आमदार होते. तर महत्त्वाचं म्हणजे मनसे आणि एमआयएमचे दोन असे तीन आमदार तटस्थ होते.
कोविड काळात काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांचा मृत्यू झाला ही जागा पुन्हा आपलीकडे राखण्यात काँग्रेसला यश आलं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेली पंढरपूरची जागा पोटनिवडणुकीत भाजपने जिंकली. भाजपची संख्या वाढली तरी अपक्ष गीता जैन यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचे संख्याबळ आहे तसेच राहिले.
विधानसभेची एकूण सदस्य संख्या 287 आहे. ( शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे ) रिक्त जागांच्या संख्येत अधिक 1 म्हणजे 7 यांचा भागाकार करून येणारी कोटा हा 41.1 आहे. त्यामुळे मतांचा कोटा 42 धरला जाईल.
या सूत्रानुसार भाजप 113 मतांपैकी 84 मतांनी दोन खासदार सहजपणे निवडून येऊनही भाजपची 29 मते शिल्लक राहतात. तिसरा उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपला 13 अधिक मतांची गरज आहे.
शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. शिवसेना 13, राष्ट्रवादी काँग्रेस 12, कॉंग्रेस 2 आणि 16 इतर पक्ष, अपक्ष मिळून 28 संख्या भरते. त्यामुळे दुसऱ्या उमेदवारासाठी शिवसेनेला 14 मतांची अधिक गरज भासणार आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपली अधिकची मते शिवसेनेला देतील. मात्र, सहावी जागा निवडून आणणं हे शिवसेनेसाठी कठीण असेल. राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे दोघेही विधानसभेचे सदस्य आहेत.
मात्र, हे दोघे सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी राष्ट्रवादीला कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. तर, शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले आहे. त्यामुळे शिवसेनेलाही एका मताचा तोटा जाणवणार आहे.
सत्ता स्थापनेपासून तटस्थ राहिलेले मनसे आमदार राजू पाटील आणि एमआयएमने आपली भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र, हनुमान चालीसा वादावरून मनसेला भाजपची साथ मिळाल्याने मनसे भाजपच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमआयएमची 2 मते या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षांना मतं दाखवावी लागतात. त्यामुळे सर्व आमदारांना 'व्हिप' (whip) लागू केला जातो. पण, अपक्ष आमदारांना 'व्हिप' लागू होत नाही. त्यामुळेच या निवडणुकीत मोठया प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली आहे.