PM Modi attends the RBI: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. आज देशातील सर्वात मोठ्या केंद्रीय बँक भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 90 वर्षे पूर्ण झाले आहेत. तसंच, नवीन आर्थिक वर्ष 2024-25ची देखील सुरुवात झाली आहे. आरबीआयला 90 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे देखील उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी आरबीआयच्या 90 वर्षांच्या कामकाजाबद्दल बोलताना सांगितले की, आरबीआयची भूमिका देशातील बँकिंग सिस्टम मजबूत बनवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आरबीआय जे काही कार्य करतेय ते देशातील सामान्य जनतेच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करते. देशातील तळागाळातील जनतेपर्यंत आर्थिक फायदे पोहोचवण्यासाठी आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सध्याच्या वातावरणातही आरबीआयने जगभरात स्वतःची वेगळी ओळख स्थापित केली आहे. जगभरातील मजबूत बँकिग सिस्टममध्ये आज भारताची बँकिंग सिस्टमचा समावेश आहे. बँकिंग सिस्टममध्ये आलेले परिवर्तन जगभरासाठी एक शिकवण आहे. आरबीआयचे काम थेट सर्वसामान्य माणसांशी जोडलेले आहे. गेल्या 10 वर्षांत खूप काही बदलले आहे. पण हा फक्त एक ट्रेलर आहे. अजून खूप काही साध्य करायचं आहे. देशाला खूप पुढे घेऊन जायचं आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
यूपीआयच्या माध्यमातून बाराशे कोटींचे व्यवहार होत आहेत. आरबीआय आता सेंट्रल बँक डिजीटल करन्सीवरही काम करत आहेत. एका दशकात आपण पूर्णपणे नवीन बँकीग व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेत प्रवेश करु शकलो आहोत. पुढच्या 10 वर्षांत डिजीटल व्यवहारांना शक्यतांना विस्तार करायचा आहे. कॅशलेस इकोनॉमिच्या बदलांवर लक्षदेखील ठेवायचे आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
भारतातील प्रत्येक क्षेत्रात कर्जाची नितांत गरज असेल. जिथे कर्जाची गरज आहे, तिथे देशाच्या बँकिंग व्यवस्थेची भूमिका खूप महत्त्वाची असेल. आरबीआयने या ब्ल्यू प्रिंटसाठी स्वतःचे कौशल्य विकसित केले पाहिजे आणि ते करत आहे त्याप्रमाणे ' आउट ऑफ द बॉक्स' काम करावे. सध्या 100 दिवस मी निवडणुकीच्या काळात व्यस्त आहे. त्यामुळं तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच धमाधक काम येणार आहे, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.