ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचं निधन

संपूर्ण युगाचं भान असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक म्हणून सुप्रसिद्ध असणारे लेखक अरुण साधू यांचं आज पहाटे चार वाजता मुंबईच्या सायन रुग्णालयात निधन झालं.

Updated: Sep 25, 2017, 09:01 AM IST
ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचं निधन title=

मुंबई : संपूर्ण युगाचं भान असणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक म्हणून सुप्रसिद्ध असणारे लेखक अरुण साधू यांचं आज पहाटे चार वाजता मुंबईच्या सायन रुग्णालयात निधन झालं. ते ७५ वर्षाचे होते. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. काल दुपारी त्यांना हृदयाचे ठोके कमी झाल्यानं त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  पण त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिले नाहीत. 

आज पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यावर मुंबईत इंग्रजी पत्रकारितेला मराठी चेहरा म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. टाईम्स ऑफ इंडियामध्ये अर्थकारण आणि राजकारणाचे पदर उलगड्यात त्यांचा हातखंडा होता. फ्रीप्रेस जरनल या इंग्रजी वृत्तपत्राचे ते संपादकही होते. 

पत्रकारितेतल्या झळाळत्या कारकिर्दीसोबतच त्यांनी मराठीत साहित्यात राजकीय कादंबऱ्यांच्या पर्वात आपला कधीही न पुसला जाणारा ठसा उमटवला.  साधूंच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या कादंबऱ्या मराठी साहित्यातल्या मैलाचा दगड मानल्या जातात.  त्यांच्या सिंहासन या कादंबरीवर आधारित सिंहासन हा चित्रपट आजही मराठी चित्रपट सृष्टीतील कालातीत कलाकृती म्हणून ओळखला जातो..

कादंबऱ्यांसोबतच लघुकथा, ललित लेखन, समकालीन इतिहास, मान्यवरांची चरित्र, भाषांतरे अशा अनेक साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी मुशाफिरी केली. ऐशींव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. जनस्थान पुरस्कारासह अनेक महत्वाच्या पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. 

अरुण साधूंच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. खऱ्या अर्थानं साधूवृत्तीनेच जगतानं मृत्यूसमयीही त्यांनी हे भान जपलं. त्यांची कीर्ती बघता अत्यंसंस्काराचं अवडंबर होऊ नये या हेतूनं त्यांनी देहदान केलं. साधूंच्या जाण्यानं मराठी साहित्य आणि पत्रकारितेची कधीही भरून न निघणारी हानी झालीय.