Loksabha : मुंबई काँग्रेसमधील नाराजी नाट्य संपता संपेना; वर्षा गायकवाड यांना निवडणूक जड जाणार?

Varsha Gaikwad, Mumbai North Central : उज्जवल निकम यांच्याविरोधात उमेदवार असलेल्या वर्षा गायकवाड यांना लोकसभा निवडणूक जड जाणार की काय? असा प्रश्न विचारला जातोय. त्याला कारण काँग्रेसमधील नाराजी नाट्य..!

सौरभ तळेकर | Updated: Apr 30, 2024, 08:09 PM IST
Loksabha : मुंबई काँग्रेसमधील नाराजी नाट्य संपता संपेना; वर्षा गायकवाड यांना निवडणूक जड जाणार?  title=
Varsha Gaikwad Candidature of North Central Mumbai

Mumbai North Central Loksabha Election 2024 : उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाडांनी (Varsha Gaikwad) आपला उमेदवारी अर्ज भरला. जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं. यावेळी वडिलांच्या आठवणींनी वर्षा गायकवाड भावूकही झाल्या. मात्र, वर्षा गायकवाड यांचं दु:ख वेगळंच होतं. वर्षा गायकवाडांविरोधातली नाराजीही चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळतंय. उमेदवारी अर्ज भरताना वर्षा गायकवाड यांच्यासोबत प्रिया दत्त, अस्लम शेख आणि काही नेते उपस्थित होते. मात्र, उत्तर मध्य मुंबईतले काँग्रेसचे बडे नेते मात्र दिसले नाहीत. वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा  माजी मंत्री नसीम खान, माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी असे काँग्रेसचे बडे नेते गैरहजर राहिले. वर्षा गायकवाडांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध असल्याचं समजतंय.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मुस्लिमबहुल आहे. त्यामुळे इथून उमेदवारी मिळण्याची आशा नसीम खान यांना होती. मात्र उमेदवारीची माळ वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात पडली त्यामुळे नसीम खान यांनी स्टार प्रचारकपदाचाही राजीनामा दिला. वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आलं नाही. वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीवरुन नसीम खान यांच्यासह माजी मंत्री सुरेश शेट्टी, आमदार भाई जगताप हेदेखील नाराज असल्याचं समजतंय.  वर्षा गायकवाड यांनी थेट राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरुद्ध तक्रार केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता वर्षा गायकवाड यांना निवडणूक जड जाणार की काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

नाराजी नाट्य संपता संपेना 

नसीम खान हे चांदिवलीचे माजी आमदार आहेत. माजी मंत्री असलेल्या नसीम खान यांचा मुस्लिम मतांवर मोठा प्रभाव आहे. भाई जगताप हे वर्षा गायकवाड यांच्याआधी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. जोगेश्वरी पूर्वमधून विधानसभा लढलेल्या भाई जगतापांनी कामगार नेते आणि मराठी चेहरा म्हणून ओळख आहे. चंद्रकात हंडोरे हे माजी मंत्री आहेत.  राज्यसभेचे विद्यमान खासदार असलेले चंद्रकांत हंडोरे यांची मुंबईतला मोठा दलित चेहरा म्हणून ओळख आहे. तर सुरेश शेट्टी हे अंधेरी पूर्वचे माजी आमदार आहेत. माजी मंत्री असलेल्या सुरेश शेट्टींचा दक्षिण भारतीय मतांवर मोठा प्रभाव आहे. तेव्हा उत्तर मध्य मुंबईत मोठा प्रभाव असलेले हे चारही नेते गैरहजर असल्याने वर्षा गायकवाडांच्या अडचणीत वाढ झालीय.

दरम्यान, मुंबई काँग्रेसमधली ही नाराजी लवकरच दूर झाली नाही तर वर्षा गायकवाडांच्या अडचणी वाढण्याचीही शक्यता आहे. कारण वर्षा गायकवाड यांच्यासमोर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचं आव्हान असणार आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x