North Mumbai Loksabha Election 2024 : उत्तर मुंबई. बोरिवलीचं नॅशनल पार्क हे इथलं मुख्य आकर्षण. मढ, मार्वे, मनोरी, गोराई म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी. भर उन्हाळ्यात मुंबईकरांचं हक्काचं मौजमजेचं ठिकाण असलेलं वॉटर किंगडम. मराठी, गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांचा भरणा असलेला हा मतदारसंघ.. इथं समस्यांचीही प्रचंड दाटीवाटी आहे. पियूष गोयल यांच्यासारखे केंद्रीय मंत्री मैदानात असल्यानं भाजपसाठी (BJP) ही जागा प्रतिष्ठेची बनलीय. पियुष गोयल (Piyush Goel) यांच्याविरोधात काँग्रेसने भूषण पाटील (Bhushan Patil) यांना उमेदवारी दिली आहे.
उत्तर मुंबईतले प्रश्न
नॅशनल पार्क, मालाड, कांदिवली पश्चिमेच्या दलदलीत अवाढव्य झोपड्या वाढल्यात. या भागातील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडलेत. मुंबई-ठाणे अंतर कमी करण्यासाठी नॅशनल पार्कजवळून भुयारी मार्ग करण्याची घोषणा झाली, मात्र प्रत्यक्षात काम सुरू झालेलं नाही. नॅशनल पार्कमधील वन जमिनींचा प्रश्न अजून निकाली निघालेला नाही. इथल्या नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मीरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पामुळं मुंबईच्या प्रवेशद्वारावरच वाहतूक कोंडी सुरू होते.
स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला. उत्तर मुंबई हा भाजपचा परंपरागत बालेकिल्ला. 1989 पासून 1999 पर्यंत लागोपाठ पाच टर्म राम नाईकांनी हा बालेकिल्ला जपला. 2004 साली अभिनेता गोविंदाला काँग्रेसनं मैदानात उतरवलं. या विरार का छोकरानं राम नाईकांसारख्या दिग्गज नेत्याचा पाडाव केला.
उत्तर मुंबईचं राजकीय गणित
2009 मध्ये गोविंदाऐवजी काँग्रेसनं संजय निरुपम यांना तिकीट दिलं. त्यांनी पुन्हा एकदा राम नाईकांना हरवलं. 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपचे गोपाळ शेट्टी खासदार म्हणून विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या संजय निरुपमांना धूळ चारली. 2019 मध्ये काँग्रेसनं सिने अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरांना रिंगणात उतरवलं. मात्र गोपाळ शेट्टींनी त्यांचा धुव्वा उडवला. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 4, काँग्रेसचा 1 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 आमदार इथं आहे.
यंदा भाजपनं विद्यमान खासदार गोपाळ शेट्टींचा पत्ता कापला. त्यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारीची संधी देण्यात आलीय. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या विनोद घोसाळकरांच्या नावाची चर्चा होती. जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आलाय आणि काँग्रेसने भूषण पाटील यांच्या नावाची घोषणा केली.
पियूष गोयल यांच्या उमेदवारीमुळं इथं स्थानिक विरुद्ध बाहेरचा, मराठी विरुद्ध गुजराती असा वाद निर्माण केला जाऊ शकतो. त्यामुळे आता पियूष गोयल यांच्यासाही ही निवडणूक सोपी जाणार की अवघड? याचं उत्तर मतदारच देतील.