मुंबई : सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. चौकशी समितीनं ही घोषणा केली आहे. पक्षानं सदाभाऊंना मंत्रीपद सोडण्याचे निर्देश पक्षानं दिले आहेत, असं असलं तरी सदाभाऊंनी मंत्रीपद सोडण्याची गरज नसल्याचं भाजपामधल्या सूत्रांनी सांगितलं आहे.
सदाभाऊंचं मंत्रीपद पक्षाच्या कोट्यातलं असल्यामुळे राजीनामा द्यावा, असा निर्णय पक्षाच्या कार्यकारिणीत घेणार असल्याचं चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी स्पष्ट केलंय. गेल्या काही महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात कलगीतुरा रंगला होता.
सदाभाऊ मंत्री झाल्यापासून हा दुरावा अधिकच वाढला. राजू शेट्टींनी शेतक-यांसह केलेल्या पदयात्रेतही सदाभाऊ खोत फिरकले नव्हते. आता सदाभाऊंनी मंत्रीपद सोडावं, अशी सूचना स्वाभिमानीनं केली आहे. मात्र सदाभाऊंकडून काढून इतर कुणाला मंत्रीपद देणार का, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमध्ये राहणार की नाही, याबाबतचा संभ्रम मात्र कायम आहे.