close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वादग्रस्त वक्तव्य : साध्वीच्या उलट्या बोंबा, उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले

 साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने उलट्या बोंबा मारल्या आहेत. तर शहिदांचा अपमान होईल, असे वागू नका, भाजपला सावरुन घेत उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले आहे. 

Updated: Apr 21, 2019, 12:04 AM IST
वादग्रस्त वक्तव्य : साध्वीच्या उलट्या बोंबा, उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले

मुंबई : मी माफी मागितली, माझा छळ करणारे माफी मागणार का? साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने उलट्या बोंबा मारल्या आहेत. तर शहिदांचा अपमान होईल, असे वागू नका, भाजपला सावरुन घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मौन सोडले आहे. दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यामुळं उफाळलेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. साध्वींचे मत हे वैयक्तिक असल्याचं सांगत त्यांना पाठिशी घालण्याची भूमिका भाजपने घेतलीय. तर या वक्तव्याचा निषेध करायचा की समर्थन करायचं, यावरून शिवसेना गोंधळल्याचं दिसत आहे. देशभरात संतापाची लाट उसळली ती साध्वी प्रज्ञासिंह यांच्या या बेजबाबदार वक्तव्यानं. त्यानंतर काही तासांत प्रज्ञासिंहांनी माफी मागितली. पण ही माफी तोंडदेखली असल्याचं १२ तासात पुन्हा स्वतः प्रज्ञासिंहांनीच सिद्ध केलं. 

साध्वी प्रज्ञासिंह यांचं हे विधान संतापजनक तर होतंच. मात्र तमाम भाजपा नेत्यांचा त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार त्याहूनही धक्कादायक होता. प्रज्ञासिंह यांचं विधान आक्षेपार्ह आहे की नाही, हे ठरवायला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मात्र २४ तास लागले. त्यातही भाजपाचा कॉपीराईट असणारा 'पार्टी विथ डिफरन्सचा' गुण शिवसेनेतही झिरपल्याचं दिसून आलं. उद्धव ठाकरेंनी साध्वीच्या वक्तव्याचा निषेध केला, तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी मात्र साध्वीचं विधान समजून घेण्याचा उपदेश केला. 

म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो, अशी म्हण आहे. साध्वीच्या वक्तव्यापेक्षा त्यांच्या वक्तव्याचं समर्थन आणि त्यांची अबाधित राहिलेली भोपाळची उमेदवारी या बाबी देशाच्या इतिहासात 'आणखी एक भोपाळ दुर्घटना' म्हणून नोंदवली जाण्याची चिन्हं आहेत.