मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची सर्वात महत्त्वाची बातमी. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यामुळं राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गेल्या दोन दिवसात संजय राऊत दोनवेळा मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत अजिबात संभ्रमावस्था नाही, सरकार पाच वर्षांचा कार्यक्रम पूर्ण करेल असं म्हटलं आहे. सरकार अस्थिर होईल अशा भ्रमात कुणी राहू नये, महाविकास आघाडी सरकार स्वबळावर आलं आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवारांना भेटलो यात काय एवढं आश्चर्य, बैठीकवर प्रश्नचिन्ह निर्माण करुन नये असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सूत्र जागी झाली असतील तर त्यांना जागा राहू द्या त्यांना झोपेची गोळी कधी द्यायची ते आम्ही पाहू, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार आहेत त्यांना चुकीच्या पद्धतीने प्रकरणात त्रास दिला जात आहे, आमचा आमदार अडचणीत आला असेल आणि त्याला विनाकारण त्रास देत असतील तर काय मार्ग काढावा हे पाहावे लागेल, पक्ष पूर्णपणे प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी आहे आणि राहणार असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. प्रताप सरनाईक आणि माझी चर्चा झालेली आहे, प्रताप सरनाईक शिवसैनिक आहेत आणि शिवसेनेतच राहणार असल्याचंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
त्याआधी सकाळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तीन दिवसातली ही दुसरी भेट आहे. तीन दिवसापूर्वी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर दोन तास चर्चा झाली होती. त्यानंतर आज दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं झाली. या चर्चेनंतर लगेचच संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय, याचे आडाखे राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत.