मुंबई : Sanjay Raut On Agneepath Yojana : ठेकेदारीने सैन्यभरती होत असेल तर ती पद्धत अयोग्य आहे. ठेकेदारीने सैन्यभरती झाल्यास तो लष्कराचा अपमान असेल, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
यावेळी शिवसेनेने मोदी सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रातील सरकारची प्रत्येक योजना अपयशी ठरली आहे. सैन्यामध्ये जर ठेकेदारी पद्धतीने भरती होणार असेल तर भारतीय सैन्याची प्रतिष्ठा रसातळाला जाईल. सैन्यावर संपूर्ण देशाची जबाबदारी आहे, त्यांना कंत्राटी पद्धतीने कसं काय घेतलं जाऊ शकत, असे थेट सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ठेकेदारी पद्धतीने भरती हा संपूर्ण भारतीय सैन्य दलाचा अपमान आहे. फक्त नोकरी म्हणून कामावर ठेवणे हा संपूर्ण भारतीय सैन्य दलाचा अपमान आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान आहे. ठेकेदारीवर काम करणारे दुसरे असतात. देशाचं रक्षण करणाऱ्या सैन्याला ठेकेदारीवर ठेवले जाऊ शकत नाही, असे राऊत म्हणाले.
देशात सध्या काय चाललं आहे किंवा काय होणार आहे हे कोणालाच माहित नाही. या योजनेवरुन संपूर्ण देशात वणवा पेटला आहे. मोदी सरकारने 10 लाख, 20 लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. याआधी 2 कोटी 10 कोटी अशा घोषणा केल्या होत्या. आता नवीन अग्निपथ. सैन्याला एक शिस्त असते. सैन्यामध्ये ठेकेदारीने सैन्यभरती झाल्यास तो लष्कराचा अपमान असेल, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, त्यांनी यावेळी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर भाष्य केले. सर्वच पक्षाचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत आहेत. सध्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची एक प्रकिया असते. त्यानुसार नेते संवाद साधत असल्याचे राऊत म्हणाले.