महाराष्ट्राची बदनामी कुणी करत असेल तर गप्प बसणार नाही - संजय राऊत

संजय राऊत यांचा भाजपला टोला 

Updated: Sep 29, 2020, 04:16 PM IST
महाराष्ट्राची बदनामी कुणी करत असेल तर गप्प बसणार नाही - संजय राऊत  title=

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या होत्या. राज्यात या भेटीवर नंतर वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्यावधी निवडणुका होणार नाही असं म्हटलं होतं. त्यावर आज संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं की, 'चंद्रकांत पाटील यांच्या विधानाकडं सकारात्मक दृष्टीने पाहतोय. ते नेहमीच त्यांच्या भूमिका सकारात्मक मांडत असतात, ते म्हटले की मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत. निवडणूक आयोगाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडं आली असेल तर स्वागत आहे. पण उद्धव ठाकरे सरकार ५ वर्षे पूर्ण करेल.'

'माझ्या सर्व मुलाखती या अनकटच आणि अनएडिटेड असतात. राहूल गांधी, अमित शाह यांचीही मुलाखत घेणार आहे. त्यांना जरा भेटलो तरी वादळ निर्माण झालंय. भेटीवरून कुणी नाराज असेल असं वाटत नाही. संकेत द्यायचे आहेत ते वर्षापूर्वी दिलेत. राजकीय विचारांचे नाहीत, त्यांना भेटू नये असा कायदा आहे का ?. संवाद हा राजकीय पक्षांमध्ये हवाच. असं देखील राऊतांनी म्हटलं आहे.

'राजकीय भूकंप वगैरे होत नाहीत, चंद्रकांत पाटील म्हटले की पहाटे परत भूकंप होणार. त्यांनी गजर लावून ठेवलाय की माहिती नाही. शिवसेना बिहार निवडणूक लढणार की नाही यावर तिथल्या राजकीय पक्षांचे भविष्य नाही. आमच्या लढण्याचा त्रास होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. लवकरच यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा होईल. असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

'गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, हा आक्षेप आहे. निवडणूक लढावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण यासाठी केला होता का अट्टाहास, हा खरा प्रश्न आहे. सुशांत सिंह प्रकरणात ज्यांनी ज्यांनी आपले दात उचकटले होते, त्यांचे दात घशात जातील. याची मला खात्री आहे. यात सेनेच्या केसालाही धक्का लागला नाही. कृषी विधेयकासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांशी चर्चा करत आहेत.'

'महाराष्ट्राची बदनामी कुणी करत असेल तर गप्प बसणार नाही. राग व्यक्त करायला हवा, तरूण आहेत त्या. राग व्यक्त चांगल्या मानसिकतेचे लक्षण आहे, फक्त त्यात विकृती नसावी.' अशी राऊत यांनी कंगनाच्या नव्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.