मुंबई: एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर आमदार, खासदार, नगरसेवकांसह अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. आता रामदास कदम यांनीही शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी झी 24 तासशी बोलताना आपली बाजू मांडली. शिवसेनेसाठी काय केलं? याबाबत सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी नुकतीच त्यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचं सांगितलं.
"माझी त्यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. मी बोललो त्यांच्याशी. माझे सहकारी होते. मी अनेक गोष्टी त्यांच्याशी बोललो. संकट काळात तुमची पक्षाला कशी गरज होती? हे त्यांना सांगितलं. पण त्यांची भूमिका वेगळी आहे. रामदास कदम किंवा आम्ही सगळ्यांना पक्षांनी भरभरून दिलं, अस मी मानतो. एखादी गोष्ट मला मिळाली नाही तर मी मनात ठेवील. मलाही वाटतं अनेकदा अन्यायाची गोष्ट झाली आहे. तरी जे मला मिळालं आहे, ते शिवसेना या चार अक्षरांमुळे मिळालं आहे. मी तर कधीच मंत्री झालो नाही. ते तर अनेकदा मंत्री झाले.", असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
रामदास कदम यांची राजकीय कारकिर्द
रामदास कदम हे सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. 2009 मध्ये रामदास कदम यांचा पराभव झाला. 2010 मध्ये शिवसेनेने त्यांना विधानपरिषदेवर पाठवत मोठी संधी दिली. 2005 ते 2009 या काळात ते विरोधी पक्षनेते होते. 2014 मध्ये त्यांना युती सरकारमध्ये पर्यावरण मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.