विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव फेटाळला

संसंदीय कामकाजमंत्री अनिल परब यांचा भाजपला टोला

Updated: Feb 26, 2020, 02:31 PM IST
विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव फेटाळला

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव भाजपकडून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना सादर करण्यात आला होता. पण विधानसभेत सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळण्यात आला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नियमात बसत नसल्याचं सांगत हा प्रस्ताव फेटाळून लावला. मात्र हा प्रस्ताव मांडण्यासाठी भाजपनं कामकाज सुरू झाल्यापासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र 'भाजपप्रणित केंद्र सरकारनं सावरकरांना भारतरत्न जाहीर करावा त्यानंतर राज्य सरकार पंतप्रधान मोदी आणि राज्यातल्या भाजपच्या नेत्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार,' असल्याचा टोला संसंदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी लगावला. 

'राज्य, देश उभारणीत ज्या महान व्यक्तींचं मोलाचं योगदान आहे त्यांचा आदर करावा. चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात जर एखादी चर्चा येणार असेल तर त्याबाबत कुणालाही आक्षेप घेण्याचं कारण नाही. ज्या व्यक्ती हयात नाहीत अशा व्यक्तींबद्दल अनावश्यक विधानं करून गैरसमज पसवण्याचं काही काम नाही. सावरकरांचं योगदान नाकारता येणार नाही.' अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सावरकरांचा पहिलाच स्मृती दिन नाही. त्यामुळेच आता प्रस्ताव का असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित केला. 

सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त विधीमंडळ इमारतीच्या लिफ्टजवळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा एक फोटो भाजप आमदारांनी ठेवला होता. या फोटोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही आदरांजली वाहिली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी आदरांजली वाहिली. सभागृहात भाजपा नेते ‘मी पण सावरकर’ असं लिहिलेल्या टोप्या घालून कामकाजात सहभागी झाल्याचं पहायला मिळालं. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त सरकारने सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडावा अशी मागणी भाजपने विधानसभेचं कामकाज सुरू होताच केली. या प्रस्तावावरून शिवसेनेची कोंडी करण्याचं भाजपचं राजकारण उघड होतं. महाविकास आघाडीतील ही वैचारिक दुफळी समोर आणण्यासाठी आणि शिवसेनेसमोर अडचण करण्यासाठी भाजपचा प्रयत्न होता.