खुशखबर! स्टेट बँकेकडून गृहकर्जाच्या व्याजदरात दरात लक्षणीय कपात

येत्या १० तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. 

Updated: Apr 9, 2019, 08:24 PM IST
खुशखबर! स्टेट बँकेकडून गृहकर्जाच्या व्याजदरात दरात लक्षणीय कपात title=

मुंबई: भारतीय स्टेट बँकेकडून मंगळवारी गृहकर्जाच्या व्याजदरात लक्षणीय कपात घोषित करण्यात आली. त्यानुसार स्टेट बँकेकडून सर्व मुदतीच्या गृहकर्जांवरील व्याजदर ०.५ टक्क्यांनी कमी करण्यात आले. त्यानुसार एमसीएलआर आणि गृहकर्ज अशा दोन्ही दरात कपात केली आहे. परिणामी एमसीएलआर ८.५५ टक्क्यांवरून ८.५० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. येत्या १० तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. 

याशिवाय, ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जाचे व्याजदर ०.१० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. तर ३० लाखांपेक्षा कमी रक्कमेच्या गृहकर्जासाठीचे व्याजदर ८.७० ते ९ या स्लॅबमधून ८.६० ते ८.९० टक्के या स्लॅबमध्ये आले आहेत. तर बचत खात्यावरील व्याजदरही बदलले आहेत. सुधारित दरांनुसार आता तीन लाखांपर्यंतच्या ठेवीवर ३.५० टक्के तर एक लाखापेक्षा अधिकच्या ठेवीवर ३.२५ टक्के इतके व्याज मिळेल. बचत खात्याचे नवे व्याजदर १ मे पासून लागू होतील.

यापूर्वी सोमवारी एचडीएफसी बँकेकडूनही एमसीएलआरमध्ये कपात करण्यात आली होती. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि अन्य प्रकारची कर्जे स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 'एमसीएलआर'मध्ये घट झाल्यामुळे सर्वसामान्य कर्जदारांचे सध्याचा व्याजदर कमी होतो आणि त्यांना पहिल्यापेक्षा कमी ईएमआय भरावा लागतो.

काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर झाले. या पतधोरणात रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता रेपो रेट सहा टक्के इतका झाला आहे. पतधोरण समितीमधील चार जणांनी रेपो दरातील कपातीच्या बाजूने तर दोघांनी विरोधात मतदान केले. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर देशातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडूनही व्याजदरांमध्ये कपात करण्यात येत आहे.