मुंबई हादरली! 4 वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या बाथरुममध्ये बलात्कार, कर्मचाऱ्यानेच केले अमानुष कृत्य

Mumbai Crime News Today: मुंबईच्या कांदिवली परिसरात 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 6, 2024, 11:56 AM IST
मुंबई हादरली! 4 वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या बाथरुममध्ये बलात्कार, कर्मचाऱ्यानेच केले अमानुष कृत्य title=
school boy Raped 4 Year Old Minor Girl in bathroom mumbai kandivali news

Mumbai Crime News: मुंबईच्या कांदिवली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. 4 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. शाळेच्याच कर्मचाऱ्याने पीडित चिमुकलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बाथरुममध्ये घेऊन गेला आणि तिच्यासोबत अमानुष कृत्य केलं आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पॉक्सोअंतर्गंत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. 

मुंबईत घडलेल्या या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण पसरलेले आहे. परिसरातील संतप्त नागरिकांनी पोलिसांना आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पिडीत मुलीच्या आईने पोलिसांकडे या प्रकरणी दाद मागितल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. 

चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कांदिवलीतील एका प्री प्रायमरी शाळेत जायची. त्यादिवशी तीला तिच्या वडिलांनी शाळेत सोडले. मात्र, 2 फेब्रुवारी रोजी मुलगी जेव्हा शाळेतून घरी परतली तेव्हा तिच्या गुप्तांगात वेदना होत होत्या. तिच्या आईने जेव्हा याबाबत विचारलं तेव्हा तिने सांगितलेली हकिकत ऐकून आईच्या पायाखालची जमिनच हादरली. 

आईने मुलीला विश्वासात घेऊन तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे विचारलं. मुलीने आईला सांगितले की, शाळेतील एका काकांनी तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बाथरुममध्ये घेऊन गेले. तिथे आत गेल्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. चिमुकल्या मुलीच्या तोंडून हे सर्व ऐकून आई सून्नच झाली. ती लगेचच मुलीला घेऊन शताब्दी रुग्णालयात गेली. त्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलिसांनी आरोपीला केली अटक 

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी लगेचच चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी परिसरात पथक पाठवून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मात्र, या घटनेने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांनी शाळेविरोधात मोर्चा काढला आहे. तर, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला काहीच दिवसांत कोर्टात सादर केले जाईल त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात केली जाणार आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये युवतींचा विनयभंग 

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 20 वर्षीय तरुणीसोबतही धक्कादायक प्रकार घडला आहे. कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीने रात्री तरुणीचा पाठलाग केला. त्यानंतर थेट तिच्या घरात घुसून आई, मुलीच्या तोंडावर धूर सोडत अश्लील प्रकार केले आहेत. इतकंच नव्हे तर, आईच्या गळ्याला चाकू लावून मुलीसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.