आरोपांमध्ये तथ्य नसेल तर..., पत्राचाळ आरोपप्रकरणी पाहा काय म्हणाले शरद पवार?

पत्राचाळ प्रकरणातील आरोपांवर शरद पवारांचं उत्तर... पाहा काय म्हणाले.

मेघा कुचिक | Updated: Sep 21, 2022, 06:21 PM IST
आरोपांमध्ये तथ्य नसेल तर..., पत्राचाळ आरोपप्रकरणी पाहा काय म्हणाले शरद पवार? title=

मुंबई : पत्राचाळ प्रकरणात तुरुंगात असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात ईडीने (ED) काही दिवसांपूर्वी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांनी पत्राचाळ (Patra chawl) भाडेकरुंची बैठक घेतली असा उल्लेख आहे. यानंतर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkalkar) यांनी याप्रकरणी शरद पवार यांची चौकशी करावी असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे. या आरोपाला आज शरद पवार यांनी स्वत: उत्तर दिले. (Sharad pawar on allegation)

लगेच चौकशी करा, आरोपांमध्ये तथ्य नसेल तर....- शरद पवार 

"माझ्यावर आरोप केलेत ना, आता लगेच चौकशी करा. मी तर म्हणतो पुढच्या चार-आठ-दहा दिवसांमध्ये या प्रकरणाबाबत माझी चौकशी करा. पण त्या आरोपांमध्ये जर तथ्य नसेल तर आरोप करणाऱ्यांसंबंधी राज्य सरकारची काय भूमिका असेल हे आधी स्पष्ट करा" असे उत्तर शरद पवार यांनी दिले आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना पत्राचाळ भाडेकरुंच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी भाडेकरुंची बैठक घेतली होती. मात्र त्या बैठकीत तेव्हा कोणताच निर्णय झाला नाही. प्रकल्पाबाबत सरकार निर्णय घेईल असे मत शरद पवार यांनी त्यावेळी बैठकीत व्यक्त केले होते. त्या बैठकीचा इतिवृत्तही त्यांनी माध्यमांकडे पाठवला आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार यांनी असे आरोप म्हणजे शरद पवार यांना बदनाम करण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे. "शरद पवार यांनी आतापर्यंत १०-२० हजार बैठका राज्यभर घेतल्या असतील. राज्यात अनेक प्रकल्पांना दिशा देण्याचं काम त्यांनी केले आहे. चर्चा करुन संवाद साधनं आणि मध्यममार्ग काढणे हाच त्या बैठकांचा हेतू असतो. चौकशी करा आमचं काहीही म्हणणं नाही. मात्र पराचा कावळा करु नका. शरद पवार कृषी मंत्री असताना पत्राचाळबाबत जी बैठक झाली त्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. या बैठकीत सरकार निर्णय घेईल असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. आरोप जर बेछूट असतील तर आरोप करणाऱ्यांची चौकशी कराल काय ? शरद पवारांना बदनाम करण्याचे काम सुरु आहे." असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

अतुल भातखळकर यांनी काय आरोप केले आहेत ?

गुरुआशिष कंपनीला पत्राचाळ प्रकल्पाचे काम मिळावे यासाठी संजय राऊत यांनी तत्कालिन कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली होती. त्या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्रीही उपस्थित होते. त्यामुळे या प्रकरणी शरद पवार यांचीही कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी अशी मागणी भाजपा नेते अतुल भातळखर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखीपत्राद्वारे केली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा संजय राऊत यांच्याशी काय संंबंध होता ? मराठी माणसाला बेदखल करण्याचा तो एक डाव होता असा आरोपही अतुल भातखळकर यांनी केला आहे.