नवी दिल्ली: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास सरकार अडचणीत आलं आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या भूमिकेकडेही लक्ष लागून आहे. राज्यात राजकीय वातावरण तापलं असताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे दिल्लीत काही महत्त्वाचा निर्णय घेतात का? याकडे राजकीय जाणकारांच्या नजरा लागून आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचं सांगितलं आहे. "उद्धव ठाकरे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आमदार परत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना समर्थन देतील.", असा विश्वास अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. "बंडामागे भाजपाचा हात असू शकतो. त्यांच्याकडे संख्याबळ असेल तर ते सिद्ध का करत नाहीत? आज नाही तर उद्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील. आमदारांना परत आणण्यासाठी पावलं उचलली जातील.", असंही शरद पवार यांनी पुढे सांगितलं.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास 38 आमदार गुवाहटीत आहेत. त्यासोबतच त्यांना आणखी 10 अपक्ष आमदारांचा देखील पाठिंबा आहे. त्यामुळे जवळपास 50 आमदार शिंदे गटात आहेत. दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ असल्याचं सांगत शिवसेने नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलं आहे. यानंतर राजकीय राजकारण चांगलंच तापलं आहे. यावर शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली होती. यानंतर शिवसेनेकडून कायदेशीर सल्ला घेण्यात आला. यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत 16 बंडखोर आमदारांचं निलंबन होईल, असं सांगितलं आहे.