गोवा नाही, हा महाराष्ट्र, काहीही खपवून घेणार नाही - शरद पवार

हॉटेल ग्रँड हयात येथे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपले आमदार एकत्र आणत एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते हजर होते. 

Updated: Nov 25, 2019, 09:32 PM IST

मुंबई : हॉटेल ग्रँड हयात येथे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपले आमदार एकत्र आणत एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते हजर होते. आम्ही एकूण 162 आहोत असं दाखवण्याचा या प्रयत्न असल्याचं तसेच विविध प्रकारच्या अफवांना आळा घालण्यासाठी आणि या पक्षातील आमदारांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे सर्व आमदार एका ठिकाणी एकत्र आणले गेल्याचं सांगण्यात येत आहे.

सत्तेसाठी काहीही ही भाजपची भूमिका या महाराष्ट्रात चालणार नाही, हे आपण हाणून पाडू आणि एक नवा इतिहास घडवू असं यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं.

तसेच हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे, असं काहीही खपवून घेणारे हे राज्य नाही, धडा शिकवण्याची ताकद आमच्यात आहे, आणि धडा शिकवण्याच्या भाषेत आता शिवसेना आमच्यासोबत असल्याचं वक्तव्य यावेळी शरद पवार यांनी केलं.

भाजपाने बहुतांश राज्यात बहुमत नसताना, हरताळ फासत आपलं सरकार स्थापन केलं, कर्नाटक, गोवा आणि मणीपूरमध्ये भाजपाने जे केलं ते महाराष्ट्रात होवू देणार नाही, आपण यांना धडा शिकवून एक इतिहास घडवू याची खात्री मला असल्याचं यावेळी शरद पवार यांनी सांगितलं.

तसेच व्हीप बजावण्याविषयी जी अफवा आहे, त्यावर विश्वास ठेवू नका, मी अनेक घटनातज्ञ, निवृत्त अधिकारी यांची सर्वांची मतं याविषयी घेतली आहेत. त्यामुळे कुणाचीही आमदारकी जाणार नाही, गेली तर ते माझं व्यक्तिगत नुकसान आहे, याची खात्री या ठिकाणी तुम्हाला करून देत असल्याचं शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.