Share Market Crash Today News: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजचा सोमवार हा ब्लॅक मंडे ठरला आहे. शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली आहे. शेअर बाजारामध्ये आज सकाळी व्यवहार सुरु झाले तेव्हा शेअर बाजार 80 हजारांखाली उघडला. तसेच निफ्टीमध्येही 400 अंकांहून अधिकची पडझड झाली. शेअर बाजाराच्या सुरुवातीलाच गुंतवणुकदारांचे 14 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. अमेरिकेतील मंदीच्या पार्श्वभूमीवर बाजार गडगडल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेवर मंदीचं सावट असल्याने तेथील शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. शुक्रवारीही गुंतवणुकदारांचे 4.56 लाख रुपये स्वाह झाले होते. आता सोमवारीही बाजारात अधिक पडझड झाल्याने गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
प्री ओपन आणि सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. बीएसईचा सेन्सेक्स 80 हजारांहून खाली ओपन झाला. असून निफ्टी 50 सुद्धा 700 हून अधिक अंकांनी घसरला. बीएसई-30 चा सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरुन 79 हजार 700.77 वर सुरु झाला. तर निफ्टी-50 मधील घसरण 720 इतकी होती. दुपारी साडेअकरापर्यंत शेअर बाजारामध्ये अडीच हजार अंकांची पडझड झाली आहे. बीएसईमधील कंपन्यांचं बाजारमुल्य 13.87 लाख कोटींनी पडलं आहे. सध्या या कंपन्यांचं बाजारमूल्य 443.29 लाख कोटी इतकं आहे.
आता या पडझडीचं नेमकं कारण काय? (why share market is down today) असा प्रश्न भारतातील अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे. अमेरिकेतील कंपन्यांच्या उत्पादनांसंदर्भातील डेटा समोर आल्यानंतर जगतिक अर्थकारणाच्या केंद्रस्थनी असलेल्या अमेरिकेमध्ये मोठ्याप्रमाणात बेरोजगारी आणि आर्थिक मंदीची चिन्हं दिसत आहेत. याच मंदीची चाहूल लागल्याने अमेरिकी शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटी मोठी पडझड झाली. त्याचा परिणाम आज दोन दिवसांनी भारतीय बाजारपेठीतील व्यवहार सुरु झाल्यानंतर आपल्याकडेही दिसून आला आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच टाटा, मारुती, जेएसडब्यू, एसबीआय, एम अॅण्ड एम, टायटन, रिलायन्स यासारख्या बड्या कंपन्यांचे शेअर गडगडल्याचं दिसून आलं.
अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा फटका जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मंदीचा सर्वात मोठा फटका आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बसू शकतो असं सांगितलं जात आहे. याच भितीने गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढून घेण्यास सुरुवात केल्याने अमेरिकी शेअर बाजारात मोठी पडझड झाली. सामान्यपणे अमेरिकी शेअर बाजारामधील घडामोडींचा जगभरातील इतर सर्वच शेअर बाजारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम होतो. अमेरिकी चलन हे जागतिक स्तरावर सर्वाधिक व्यवहार होणार चलन आहे. पुढील काही काळ असाच ट्रेण्ड दिसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेमधून गुंतणवूक काढून घेतील असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.