मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shinde Group) बीकेसीच्या (BKC) मैदानावर दसरा मेळावा घेत आहेत. या मेळाव्याचा पोस्टर समोर आला आहे. या पोस्टरवर शिवसेनेचा दसरा मेळावा - हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार, गर्व से कहो हम हिंदू है. असा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांचा फोटो लावण्यात आला आहे.
बीकेसी मैदानावर शिंदे गटाच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. मुंबईतल्या बीकेसी मैदानावर 45000 पेक्षा जास्त खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. उद्याच्या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं शिंदे गटाचे कार्यकर्ते बीकेसी मैदानात दाखल होणार आहेत. बीकेसीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लिफ्टमधून स्टेजवर जाणार आहेत. हायड्रोलिक प्रकारची ही लिफ्ट आहे. याच लिफ्ट मधून एकनाथ शिंदे व्यासपीठावर जाणार असल्याची माहिती आहे.
बीकेसी मैदानावर तीन हजार मुंबई पोलिसांचा ताफा बीकेसी मैदानावर दाखल झालाय. विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बीकेसी मैदानावरील सुरक्षेचा आढावा घेतला. मेळाव्यावेळी मोबाईल न वापरण्याचं आवाहन नांगरे पाटलांनी पोलिसांना केलंय. तर ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. शिवाजी पार्कला अक्षरशः पोलीस छावणीचं रुप आलंय.
शिंदे गटाच्या मेळाव्यात बीकेसीवर 51 फूटी तलवारीचं पूजन होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची जय्यत तयारी सुरु आहे. १०० पेक्षा जास्त एलईडी स्क्रीन या ठिकाणी लावण्यात येणार आहे.