'या' पाच जागांवरून युतीचे घोडे अडले

दोन्ही पक्षांमध्ये आणखी पाच जागांवरून चढाओढ सुरु आहे.

Updated: Sep 25, 2019, 04:37 PM IST
'या' पाच जागांवरून युतीचे घोडे अडले title=

मुंबई: विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असूनही शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नाही. सुरुवातीला निम्म्या जागांसाठी आग्रही असणाऱ्या शिवसेनेने भाजपच्या ठाम पवित्र्यानंतर नमती भूमिका घेतली होती. मात्र, तरीही दोन्ही पक्षांमध्ये आणखी पाच जागांवरून चढाओढ सुरु आहे. कोणताही पक्ष या जागा सोडायला तयार नाही. 

सूत्रांच्या माहितीनुसार, युतीमधील ११ पैकी सहा जागांचा प्रश्न नुकताच सुटला. मात्र, अद्यापही पाच जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झालेले नाही. त्यामुळे आता या जागांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समोरासमोर बसून चर्चा करतील, असे सांगितले जात आहे. 

या पाच जागांमध्ये औसा (लातूर), वडाळा (मुंबई), ऐरोली (ठाणे), बेलापूर (ठाणे), उल्हासनगर (ठाणे) या मतदारसंघाचा समावेश आहे. 

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. घटस्थापनेपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ असेच सुरु राहील. नवरात्रीचे घट बसेपर्यंत युतीचे घट काही बसणार नाहीत. कारण युती जाहीर करण्यात पितृपक्षाचा अडसर आहे. आता युतीची चर्चा ही फक्त मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यातच सुरू आहे. त्यामुळे २९ तारखेपर्यंत कुठलीही अधिकृत घोषणा होणार नाही, असेही सूत्रांनी सांगितले. 

जागावाटपात भाजपने सुरुवातीपासूनच सेनेला अधिक जागा सोडायला नकार दिला होता. त्यामुळे शिवसेनेच्या जागांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच तयार करतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. यानंतर भाजप शिवसेनेसाठी केवळ ११० ते ११६ जागा सोडायलाच तयार असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे आता जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला काय असणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.