शिवसेनेचं खातेवाटप ठरलं; आदित्य ठाकरेंना पर्यावरण, दादा भुसेंकडे कृषी खाते

कृषी खात्याची धुरा दादा भुसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Updated: Jan 4, 2020, 08:49 PM IST
शिवसेनेचं खातेवाटप ठरलं; आदित्य ठाकरेंना पर्यावरण, दादा भुसेंकडे कृषी खाते title=

मुंबई: काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेचीही खातेवाटपाची यादी समोर आली आहे. शिवसेनेकडून याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी या यादीतील खातेवाटप जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यानुसार ठाकरे घराण्याचे वारसदार आणि पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदित्य ठाकरे यांना पर्यावरण आणि पर्यटन अशी दोन खाती देण्यात आली आहेत. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्यावर अनुक्रमे नगरविकास आणि उद्योग खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर राज्यातील तमाम शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या कृषी खात्याची धुरा दादा भुसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 

तत्पूर्वी काँग्रेसकडूनही आपली खातेनिहाय मंत्र्यांची यादी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे समजते. त्यानुसार बाळासाहेब थोरात यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे महसूल खात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा सोपविण्यात आली आहे. तर राज्यमंत्री असलेल्या विश्वजित कदम यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय, काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे सुपूत्र अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे. 

शिवसेनेच्या संभाव्य खातेवाटपाची यादी पुढीलप्रमाणे:

एकनाथ शिंदे : नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (MSRDC)
सुभाष देसाई : उद्योग
आदित्य ठाकरे : पर्यावरण आणि पर्यटन
संजय राठोड : वने
दादा भुसे : कृषी
अनिल परब : परिवहन आणि संसदीय कार्य
शंकरराव गडाख : मृदू जलसंधारण
संदीपान भुमरे : रोजगार हमी
उदय सामंत : उच्च व तंत्र शिक्षण
मुख्यमंत्री- सामान्य प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा