देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शनिवारी रात्री उशिरा शिवसेनेचे (Shivsena) धनुष्य-बाण (bow and arrow) हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा (froze) हंगामी आदेश दिला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने चार तासांच्या बैठकीनंतर शिवसेनेचे (Shivsena) निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच शिवसेना हे पक्षाचे नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली होती. त्यामुळे आता दोन्ही गटांना नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार होती. 10 ऑक्टोबरला नवीन नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय सादर करण्याचा आदेश आयोगाने दिले होते. यानंतर आता दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने नाव आणि चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगासमोर दिले आहेत.
उद्धव ठाकरेंनी त्रीशुल, उगवता सूर्य, मशाल असे तीन पर्याय चिन्हासाठी आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पर्याय दिले गेल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
"शिवसेना कायदेविषयक अभ्यासात कमी पडली आहे. शिंदे गट फुटल्यानंतर तर जवळपास हे निश्चित झालं होतं की हा विषय पक्षाचे नाव आणि चिन्हापर्यंत पोहोचणार आहे. आजही शिवसेनेला चिन्ह आणि पक्षाचे नाव वाचवता येऊ शकतं. त्यांनी योग्य तो कायदेविषयक अभ्यास करून पुढे अपील करावे," असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
तसेच निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे योग्य नाही. तटस्थ संस्था असणाऱ्या निवडणूक आयोगाने याकडे लक्ष दिले पाहिजे. नाहीतर इथून पुढे त्यांच्या प्रत्येक निर्णयावर संशयाने पाहिले जाईल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीने शिवसेना,काँग्रेस सोबत जाण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप उत्तर आलेलं नाही आता एकत्र यायचे की नाही हे त्यांनीच ठरवायचे आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.