कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंती दिवशीच शिवसेनेने जल्लोष मेळाव्याचं आयोजन केले आहे. मुंबईतल्या बीकेसीमध्ये आयोजित केलेल्या या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जाहीर सत्कार केला जाणाराय. त्यामागे कारणही तसंच आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला विराजमान करण्याचं स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केलं आणि याचनिमित्ताने जणू प्रत्येक शिवसैनिकात आज "जल्लोष शिवसैनिकांचा...आनंद वचनपुर्तीचा...." अशीच भावना शिवसैनिकांमध्ये आहे. आणि म्हणूनच हा जल्लोष साजरा करण्यासाठी खास शिवसेनेनं जल्लोष मेळाव्याचं आयोजन केलंय.
विधानसभा निवडणुकीत भाजपसोबतची युती शिवसेनेने तोडत एक नवं समीकरण राजकारणात आणलं...आणि मुख्यमंत्रिपद आपल्या पदरात पाडून घेतलं. मात्र यामुळे प्रखर हिंदुत्व काहीसं बाजूला पडलंय की काय असं वाटत असतानाच शिवसेनेने पुन्हा 'चलो अयोध्ये'चा नारा दिल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारच्या जल्लोष मेळाव्यात अयोध्येसह विविध विषयांवर नेमकी काय भूमिका मांडणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.
या मेळाव्यासाठी राजकीय, उद्योग आणि सिने जगतासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसंच जवळपास ५० हजारांहून अधिक शिवसैनिकांचा जल्लोष दिसून येणार आहे.
शिवसेनेचाच मुख्यमंत्री असल्यानं त्याचा फायदा पक्ष वाढीसाठी करण्याच्या दृष्टीने शिवसेना पाऊल टाकतेय.. जल्लोष मेळाव्याच्या माध्यमातून वातावरण निर्मिती तर करायचीच आहे, मात्र त्याशिवाय शिवसैनिकांमध्येही उत्साह निर्माण करण्याचा एक प्रयत्न होतोय.