होय, मी जागावाटपात तडजोड केली- उद्धव ठाकरे

जागावाटपाच्या इतिहासात शिवसेनेला सर्वाधिक कमी जागा मिळाल्या आहेत

Updated: Oct 7, 2019, 07:44 AM IST
होय, मी जागावाटपात तडजोड केली- उद्धव ठाकरे title=

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात शिवसेनेने महाराष्ट्राच्या हितासाठी तडजोड केली, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते 'सामना' दैनिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. शिवसेनेने जागावाटपात तडजोड केली असली तरी आम्हाला सत्तेत मात्र समान वाटा मिळेल, असा विश्वास यावेळी उद्धव यांनी व्यक्त केला. 

संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत उद्धव यांनी शिवसेना आणि भाजपमधील वाटाघाटींवर सविस्तपणे भाष्य केले. होय, मी युतीसाठी तडजोड केली. पण ही तडजोड महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. मी महाराष्ट्राच्या हिताचा शब्द दिल्यानंतर तुझं माझं करून खेचाखेची करणे मला पटत नाही. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाच्यावेळी आमची अडचण समजून घ्या, अशी विनंती केली होती. ती अडचण मी समजून घेतली. एकाकी लढायचेच झाले तर शिवसेना ते कधीही करू शकते, असे उद्धव यांनी म्हटले.

२०१४ च्या तुलनेत शिवसेनेची गर्जना कमी झाली आहे का, असा प्रश्न यावेळी उद्धव यांना विचारण्यात आला. त्यावर उद्धव यांनी म्हटले की, समोरचा प्रतिस्पर्धी कोण आहे, यावर गर्जना करायची किंवा नाही, हे ठरते. अन्याय असेल तिथे शिवसेना गर्जना करणारच. 

तसेच आजपर्यंतच्या जागावाटपाच्या इतिहासात शिवसेनेला सर्वाधिक कमी जागा मिळाल्या आहेत, याबद्दलही उद्धव यांना विचारणा करण्यात आली. याला उत्तर देताना उद्धव यांनी म्हटले की, हा आकडा कमी असला तरी यंदा शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येतील. वादळ असताना शांत राहायचं असतं, असे बाळासाहेबांनी मला शिकवले आहे. त्यामुळे सध्याच्या वादळात इतर पक्ष उखडून फेकले जात असताना मी शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रुजवेन, असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला. २४ तारखेला निकाल लागल्यानंतर सत्तावाटपात जबाबदारी आणि अधिकार यांचे समसमान वाटप होईल, असेही त्यांनी सांगितले.