मुंबई: जळगाव आणि सांगली महानगरपालिकेत भाजपला मिळालेला विजय म्हणजे सत्तेमुळे आलेली सूज असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. सांगली, मिरज, कुपवाडा महापालिकांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्यातलेच सब घोडे बारा टक्के घेऊन भाजपने विजय मिळवला, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात म्हटले आहे.
या विजयात संभाजी भिडे यांचीही साथ आहे. जळगाव-सांगलीमध्ये आज जे भाजपबरोबर गेले आहेत ती सत्तेबरोबर आलेली सूज आहे. सत्ता आली की, अशी सूज येतच असते. त्यामुळे हे काही चांगल्या राजकीय आरोग्याचे लक्षण नाही. आज सत्तेमुळे भाजपात आलेली मंडळी उद्या सत्ता नसताना दुसरीकडे गेलेली असतील आणि पक्षाला आज जी सूज आलेली दिसत आहे ती उतरलेली असेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
महाराष्ट्रात सरकारविरुद्ध जनतेत इतका रोष, संताप, नाराजी असताना भाजप सांगली-जळगावमध्ये जिंकला. ही तर २०१९ च्या भाजपच्या विजयाची नांदी आहे असे शंख फुंकले जातच आहेत.
मग ही जर भाजपवाल्यांना त्यांच्या विजयाची नांदी वाटत असेल तर मध्यंतरी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत जे घडले त्याला काय म्हणायचे?
प. बंगालात ममताही निवडणुकांमागून निवडणुका जिंकत आहेत व ममतांच्या पराभवासाठी स्वतः अमित शहा कोलकाता येथे घर घेऊन ठाण मांडणार आहेत. अशी जिद्द इतरांकडेही असू शकते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी जपून राहावे, असा सल्ला या अग्रलेखातून देण्यात आला आहे.