शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेने वाढेल भाजपची अडचण!

मागील साडेतीन वर्ष केंद्रात आणि राज्यात भाजपाबरोबर सत्तेत एकत्र राहिल्यानंतर शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केलीय.

Updated: Jan 24, 2018, 01:05 PM IST
शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेने वाढेल भाजपची अडचण! title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मागील साडेतीन वर्ष केंद्रात आणि राज्यात भाजपाबरोबर सत्तेत एकत्र राहिल्यानंतर शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केलीय.

मात्र भाजपासाठी शिवसेनेची ही घोषणा अडचणीची ठरू शकते. 2019 साली देशातील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी भाजपाला शिवसेनेच्या युतीची गरज आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यावर भाजपाने काहीशी सौम्य प्रतिक्रिया दिली आहे.

एकत्र केला होता धमाका

शिवसेना भाजपाची २५ वर्षांची युती २०१४ साली तुटल्यानंतर विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली. त्या आधी झालेली लोकसभा निवडणूक मात्र शिवसेना-भाजपाने एकत्र लढवून महाराष्ट्रातून घवघवीत जागा मिळवल्या होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वच मोठ्या राज्यात मोदी लाटेमुळं भाजपाला महाराष्ट्राप्रमाणे घवघवीत जागा मिळाल्या होत्या.

कुठे किती जागा मिळवल्या?

महाराष्ट्रात शिवसेना भाजपाने एकत्रित येऊन ४८ जागांपैकी ४१ जागा मिळवल्या होत्या. उत्तर प्रदेशात भाजपाने ८० पैकी ७१, मध्य प्रदेशात २९ पैकी २७, गुजरातमध्ये २६ पैकी २६, राजस्थानमध्ये २५ पैकी २५ तर बिहारमध्ये ४० पैकी २२ जागा पटकावल्या होत्या.

भाजपाला फटका बसू शकतो

मोदी लाटेवर स्वार होत देशातील सर्वच मोठ्या राज्यात भाजपाने कधी नव्हे एवढी चांगली कामगिरी लोकसभा निवडणुकीत केली होती. मात्र आता ती परिस्थिती राहिलेली नाही. गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा आलेख खाली आला आहे. तिच स्थिती कायम राहण्याची शक्यता गृहित धरली तर गुजरातबरोबरच इतर राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाला फटका बसू शकतो. त्यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा भाजपाने मिळवल्या तेवढ्या मिळवणे भाजपासाठी अवघड आहे. 

२०१९ साली देशात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी त्यामुळेच प्रत्येक राज्य भाजपासाठी महत्त्वाचे आहे. मागच्या एवढ्या नाही किमान देशात सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ५४३ पैकी २७२ जागा मिळवणे हे भाजपाचे लक्ष्य असणार. त्यासाठीच उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान ही मोठी राज्य भाजपासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळेच शिवसेनेने स्वबळाची घोषणा केली असली तरी किमान लोकसभा निवडणुकीत युती व्हावी असा भाजपाचा प्रयत्न असेल. त्यामळे शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यावर भाजपाने सावध प्रतिक्रिया दिली आहे.

तिस-याचाच होईल लाभ

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याची भूमिका एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस घेत आहे. अशात लोकसभा निवडणुकीला एकट्याने समोरे गेले तर त्यांना त्याचा फटका महाराष्ट्रात भाजपाला बसू शकतो. कारण विदर्भ वगळता मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात दोन्ही पक्षाच्या मतविभागणीमुळे भाजपाच्या जागा कमी होऊन त्याचा फायदा काँग्रेस -राष्ट्रवादीला होऊ शकतो. 

भाजपाची सौम्य प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठं राज्य आहे. त्यामुळे दिल्लीचे तख्त राखण्यासाठी भाजपाला महाराष्ट्रात शिवसेनेची साथ सोडणं परवडणारं नाही. २०१९ साली दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी भाजपाला एक-एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतरही भाजपाने त्या आक्रमकपणे शिवसेनेला उत्तर दिलेलं नाही.