मुंबई : Shiv Sena leader Pratap Sarnaik on ED action : ईडीने माझ्या दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत. मला नोटीस आली आहे. पुढील प्रक्रिया सुरु आहे. आम्ही न्यायालयात गेलो आहोत. योग्य तो न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. मी ईडीला सहकार्य करणार आहे. ते बोलवतील तेव्हा जाणार आहे, अशी पहिली प्रतिक्रिया कारवाईनंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
शिवसेना प्रवक्ता असल्याने अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रानौत यांच्या विरोधात हक्क भंग टाकला होता. तसेच केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू आहे. त्यातून माझ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ईडीला आपण सहकार्य करणार आहोत. ते बोलवतील तेव्हा जाणार आहे. हिरानंदानीमध्ये स्वतःचे माझे राहते घर आहे. मीरा रोड इथले 250 मीटरचा प्लॉट जप्त केला आहे. याची 11 कोटी 35 लाख किंमत आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
न्याय प्रकियेवर माझा विश्वास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळी काही ठिकाणी गनिमीकावा आणि काही ठिकाणी तह केला होता, याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत. ते आमचे मार्गदर्शक आहेत. ते वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. आपण याबाबत काही गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या आहेत, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
दरम्यान, ठाण्यातील शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. NSEL घोटाळ्यातील मालमत्तांची रक्कम 11.35 कोटी रुपये आहे. ज्यामध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधाच्या तरतुदींनुसार ठाणे, महाराष्ट्र येथे 2 फ्लॅट आणि जमीन जप्त करण्यात आले आहे. हे प्रकरण NSEL फसवणुकीशी संबंधित आहे, ज्यामध्ये सुमारे 13000 गुंतवणुकदारांच्या 5600 कोटी रुपयांच्या विश्वासार्हतेचा गुन्हेगारी भंग झाला होता.