शिवसेना वि. राणे पुन्हा 'सामना', संजय राऊत यांच्या टीकेवर नितेश राणेंचा 'प्रहार'

राज्यात शिवसेना विरुद्ध राणे कुटुंब असा संघर्ष पाहिला मिळतोय, आता या वादात आणखी एका प्रकरणाची भर पडली 

Updated: Sep 14, 2021, 12:32 PM IST
शिवसेना वि. राणे पुन्हा 'सामना', संजय राऊत यांच्या टीकेवर नितेश राणेंचा 'प्रहार' title=

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि राणे कुटुंबात पुन्हा एकदा 'सामना' रंगला आहे. संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात गुजरात मुख्यमंत्रीपदावरुन भाजपवर टीका केली. यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. 

गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय?

गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली? कोठे काय बदलायचे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते. पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे मॉडेल असल्याचं आदळाआपट करत सांगितलं जातं, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. भूपेंद्र पटेल यांना पुढे करुन नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे, गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय? अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. 

मुंबई मॉडेलवर बोला ना?

सामनातून करण्यात आलेल्या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गुजरात मॉडेलच सोडा. तुम्ही ऐन कोरोना काळात मुंबई पालिका आयुक्त परदेशी का बदलले ते सांगा. तुमचे ते मुंबई मॉडेलचे काय चाटायचे आम्ही??? स्वतःच्या बुडा खाली काय जळते आहे ते आधी बघा. अशा शब्दात नितेश राणे यांनी सुनावलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेपासून राज्यात शिवसेना विरुद्ध राणे कुटुंब असा संघर्ष पाहिला मिळतोय. आता या वादात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे.