दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : बातमी बहुचर्चित आणि राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी 'शिवस्मारक' प्रकल्पासंदर्भाची... राज्य सरकार शिवस्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रचना बदलण्याच्या विचारात आहे. अश्वारूढ पुतळ्याऐवजी शिवाजी महाराजांचा उभा पुतळा उभारण्याच्या पर्यायाचा विचार सरकार करत असल्याचं समजतंय.
अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'मधील सरदार पटेल यांच्या पुतळ्यासारखा शिवाजी महाराजांचा उभा पुतळा उभारण्याच्या पर्यायावर विचार सुरू आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरही शिवाजी महाराजांचा उभा पुतळा आहे. अरबी समुद्रातील स्मारकातील अश्वारूढ पुतळ्याच्या आराखड्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या पुतळ्याच्या इतर तीन ते चार आराखड्यांवर अभ्यास करण्याच्या राज्य सरकारच्या सूचना आहेत.
शिवस्मारकाच्या तांत्रिक समितीच्या २७ नोव्हेंबर २०१८ च्या बैठकीत पुतळ्याच्या रचनेविषयी चर्चा झाली. सरदार पटेल यांच्या पुतळ्याप्रमाणं उभा पुतळा उभारला तर त्याची उंची वाढवता येईल. शिवस्मारकातील अश्वारूढ पुतळ्याचा सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या आराखड्याप्रमाणे पुतळ्याची एकूण उंची २१० मीटर होती. त्यात १२१.२ मीटर ही प्रत्यक्ष पुतळ्याची उंची तर ८८.८ मीटरचा चबुतरा प्रस्तावित होता.