Sanjay Raut दिवसभर कोठडीत काय करतात? जाणून घ्या न्यायालयीन कोठडीतला दिनक्रम

नेहमी राजकीय धावपळी व्यस्त असणारे फायर ब्रँड नेते संजय राऊत न्यायलयीन कोठडीत काय करतात?

Updated: Aug 13, 2022, 02:01 PM IST
Sanjay Raut दिवसभर कोठडीत काय करतात? जाणून घ्या न्यायालयीन कोठडीतला दिनक्रम title=

Sanjay Raut : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या न्यायालयीन कोठडीत (judicial Custody) आहेत. 31 जुलैला संजय राऊत यांना ईडीने (ED) ताब्यात घेतलं. त्यानंतर ते 8 ऑगस्टपर्यंत इडी कोठडीत होते. 8 ऑगस्टला त्यांना न्यायालयात हजर केलं असता 14 दिवसांची म्हणजे 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

संजय राऊत यांचा दिनक्रम
शिवसेनेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले आणि दिवसभर राजकीय धावपळीत व्यस्त असणारे संजय राऊत आता न्यायालयीन कोठडीत नेमकं काय करत असतील याची सर्वांना उत्सुकता आहे. न्यायालयीन कोठडीतला त्यांचा दिनक्रम झी 24 तासच्या हाती आला आहे. संजय राऊत हे सध्या आर्थर रोड तुरुंगात (Arthur Road Jail) असून त्यांचा कैदी क्रमांक 8959 आहे. 

संजय राऊत पहाटेच उठतात. राऊत हे कोठडीत असताना पुस्तकं वाचनात मोठ्या प्रमाणात वेळ घालवत आहेत. वही आणि पेन मिळालं असल्याने राऊत लेखनही करत आहेत. पण हे लिखाण जेलच्या बाहेर येणार नाही, याची काळजी जेल प्रशासनाकजून घेतली जात आहे.  तसंच त्यांना वर्तमान पत्रही वाचण्यास दिली जातात. जेल मॅन्युअल प्रमाणे राऊत यांना नातेवाईकांना भेटता येत आहे.  सुरक्षेच्या कारणास्तव राऊत यांना वेगळ्या कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती आहे. 

संजय राऊत यांच्यावर आरोप
मुंबईतल्या गोरेगाव इथल्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांचा संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाल्याचा आरोप असून त्यापैकी 1 कोटी 6 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते, त्याच पैशातून अलिबाग इथं जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर आहे.